सव्वाशे वर्षातील सर्वाधिक चक्रीवादळे यंदा अरबी समुद्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 08:17 PM2019-12-04T20:17:17+5:302019-12-04T20:19:15+5:30
सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात ७ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़.
पुणे : यंदा भारतीय उपखंडातील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात गेल्या सव्वाशे वर्षातील सर्वाधिक १२ चक्रीवादळे निर्माण होण्याचा प्रकार घडला. त्यातील ७ चक्रीवादळे ही अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़. एकावेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रकार अरबी समुद्रात यंदा दोनदा झाले आहेत़. सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात ७ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़.
हवामान विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडीवारीनुसार १८९१ पासून गेल्या १२८ वर्षात प्रथमच अरबी समुद्रात इतकी चक्रीवादळे व कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाली आहेत़. यापूर्वी १९९८ मध्ये अरबी समुद्रात ६ चक्रीवादळे निर्माण झाली होती़. अरबी समुद्रात यंदा चक्रीवादळांची संख्या वाढली असतानाच बंगालच्याउपसागरातील चक्रीवादळाच्या संख्येत मात्र घट झाली आहे़. बंगालच्या उपसागरात दरवर्षी सरासरी ४ चक्रीवादळे निर्माण होतात़. यंदा पाबुक, फनी आणि बुलबुल ही ३ चक्रीवादळे निर्माण झाली होती. मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून पश्चात याची तुलना केल्यास मॉन्सून पश्चात चक्रीवादळांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे.
अरबी समुद्रात यंदा सर्वाधिक चक्रीवादळे निर्माण होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे अरबी समुद्रातील पाण्याच्या तापमानात झालेली वाढ हे आहे़. समुद्राचे तापमान २७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास गरम हवा आकाशात जाऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास पोषक वातावरण निर्माण होते़.त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात होते़ एकाचवेळी एका समुद्रात दोन वेळा दोन चक्रीवादळे तयार होण्याचा अरबी समुद्रात प्रथमच घडले आहे.
२०१९ मध्ये बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात झालेली चक्रीवादळे
* अंदमान समुद्रात ४ -८ जानेवारी पाबुक चक्रीवादळ
* बंगालच्या उपसागरात फनी २६ एप्रिल ते ४ मे दरम्यान फनी अति तीव्र चक्रीवादळ
* अरबी समुद्रात १० ते १७ मे दरम्यान वायु तीव्र चक्रीवादळ
* बंगालच्या उपसागरात ६ ते १२ ऑगस्ट अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र
* अरबी समुद्रात २२ ते २५ सप्टेंबर हिक्का अतितीव्र चक्रीवादळ
* अरबी समुद्रात २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर कमी दाबाचे क्षेत्र
* अरबी समुद्रात २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर कियार महा चक्रीवादळ
* अरबी समुद्रात ३० ते ७ नोव्हेंबर दरम्यानमहा अतितीव्र चक्रीवादळ
* बंगालच्या उपसागरात ५ ते ११ नोव्हेंबर दरम्यान बुलबुल चक्रीवादळ
* अरबी समुद्रात विषववृत्ताजवळ २ डिसेंबरपासून अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र
* अरबी समुद्रात लक्ष्यद्वीप जवळ ३ डिसेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र