राज्यात कोरोना काळात सर्वाधिक गुंतवणूक; तब्बल एक लाख कोटींचे झाले सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 01:59 PM2021-01-08T13:59:53+5:302021-01-08T14:00:15+5:30
कोरोना काळात ऑनलाईन परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचा फायदा..
पुणे : कोरोना काळातही राज्यामध्ये देशातील सर्वाधिक गुंतवणूक झाली असून तब्बल एक लाख कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. राज्यातील उद्योगविश्व गती घेत असून औद्योगिक निर्मिती 70 टक्क्यांपर्यंत पोचली आहे. या काळात ऑनलाईन परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचा फायदा झाल्याची माहिती उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्षाच्या (मैत्री) पुणे विभागाच्या व्हर्चुअल सुविधा कक्षाचे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उपचसंचालक अर्चना कोठारी यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कांबळे म्हणाले, या सुविधा कक्षाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या दिल्या जाणार आहेत. नवीन उद्योग सुरु करताना जवळपास 12 ते 13 प्रकारच्या विविध स्वरुपाच्या परवानग्या घ्यावा लागतात. त्यामध्ये एमआयडीसी, पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ आदी विभागांच्या परवानग्या लागतात. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत. मुंबईमध्ये मैत्रीचा राज्यस्तरीय कक्ष असून पुण्यात नवीन कक्ष सुरु करण्यात आला आहे. काही दिवसातच औरंगाबाद आणि नागपुरमध्येही हे कक्ष केले जाणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
यावेळी, सहसंचालक सुरवसे म्हणाले, कोरोना काळात उद्योजकांसोबत संपर्क ठेवण्यात तसेच त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यात अडचणी आल्या. त्यांच्यासोबत समन्वय प्रस्थापित करणे, उद्योजकांना मार्गदर्शन, अडचणी सोडविणे यासाठी या कक्षाचा उपयोग होणार आहे. या कक्षाद्वारे एक ‘सपोर्ट सिस्टीम’ निर्माण होईल. तर, लोंढे यांनी उद्योजकता विकास केंद्र आणि मैत्री समन्वय याविषयी माहिती दिली. आभार प्रदर्शन उपसंचालक अर्चना कोठारी यांनी केले.