जैन उद्योगांच्या डिजिटलयाझेशनला सर्वोच्च प्राधान्य - मोतीलाल ओसवाल
By admin | Published: September 30, 2016 07:26 PM2016-09-30T19:26:01+5:302016-09-30T19:26:01+5:30
डिजिटल युगात टिकून राहण्याच्या दृष्टीने जैन उद्योजक आणि उद्योगपतींना समर्थ बनविण्याचे आव्हान पेलण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, 30 : डिजिटल युगात टिकून राहण्याच्या दृष्टीने जैन उद्योजक आणि उद्योगपतींना समर्थ बनविण्याचे आव्हान पेलण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन तथा ‘जीतो’चे नवनिर्वाचित अध्यक्ष मोतीलाल ओसवाल यांनी खास ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. शुक्रवारी ‘जीतो’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना ओसवाल म्हणाले, आमच्या संघटनेची दिशा आणि कार्ये स्पष्ट आहेत. अर्थात जागतिक पातळीवर होत असलेल्या बदलाची स्पंदने जाणून घेणे काळाच्या ओघात टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. जग बदलत असतानाच देशात मोदींच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार आल्यानंतर आपल्याकडेही मोठ्या बदलांची चाहूल लागली आहे.
डिजिटल युगाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दाखविले आहे. डिजिटल होणे हा भविष्यातील यशाचा पासवर्ड आहे, अशी माझीही धारणा आहे. म्हणूनच आपला व्यवसाय, उद्योग याचा विकास आणि विस्तार करताना डिजिटलायझेशनचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जैन उद्योजकांची मानसिकता तयार करण्याला आपले प्राधान्य राहील, असे ओसवाल यांनी स्पष्ट केले. जैन उद्योजक हे व्यापारप्रवण आहेत. तथापि, जगभरातील एकूण उलाढालीच्या तुलनेत जैन उद्योजकांच्या व्यापाराचा आकार आणि आवाका छोटा आहे. त्याची व्याप्ती विस्तारण्यासाठी द्रष्टेपणाच्या संस्काराची गरज आहे. व्यापक दृष्टी आणि डिजिटलायझेशन यांची सांगड घातल्यावर चांगले परिणाम दिसतील, अशी खात्री ओसवाल यांनी व्यक्त केली.
खुद बढो और औरों को बढने दो, हा मूलमंत्र व्याप्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वस्तुत: जैन समुदायाकडे व्यापार-उद्योगाची आंतरिक नैसर्गिक प्रेरणा आहे. तरीही नव्या पिढीत , आयएएस वा आयपीएस होऊन प्रशासकीय अधिकारात निर्णय प्रक्रियेचा भाग होण्याची मनीषा बाळगणारे विद्यार्थीही आहेत. त्यातील प्रज्ञावंतांच्या निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था असलेली सहा केंद्रे देशभरात स्थापन झालेली आहेत. त्यात ३५० विद्यार्थ्यांची सोय केली जाते, अशी माहितीही ओसवाल यांनी दिली.