चेरापुंजी नव्हे, पाथरपुंजमध्ये सर्वाधिक पाऊस; देशात पहिल्या पाचमध्ये साताऱ्यातील ४ ठिकाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:07 AM2019-08-27T06:07:02+5:302019-08-27T06:07:28+5:30
नवजा आणि महाबळेश्वर ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात.
प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नवजा आणि महाबळेश्वर ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. मात्र, यंदा त्यात बदल झाला आहे. एवढेच नव्हे तर देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या चेरापुंजीपेक्षाही जादा पाऊस पडल्याची नोंद जिल्ह्यातील चार ठिकाणी झाली आहे. त्यामध्ये पाटण तालुक्यातील पाथरपुंज हे सर्वाधिक पावसाची नोंद झालेले ठिकाण बनले आहे. येथे जून ते आॅगस्टदरम्यान ७ हजार ३५९ मिलीमीटर पाऊस झाला आहे तर चेरापुंजीत ५,९३८.४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
वाई तालुक्यातील बलकवडी धरणाच्या वरील बाजूस असणारे जोर येथे ६ हजार ९८९ मिलीमीटर, पाटण तालुक्यातील नवजा येथे ६ हजार २७२ मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथील वालवण येथे ६ हजार ८४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे ६ हजार ४४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कुठे आहे पाथरपुंज?
कोयनानगरच्या नैऋेत्येला पाटण तालुक्यात पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून तिकडे जाता येते. हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. विश्ोष म्हणजे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत. येथे पडणाºया प्रचंड पावसाचे पाणी मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा ठरलेल्या वारणा नदीच्या पात्रात जाते. या नदीचा उगमही याच गावच्या पश्चिमेला आहे.
वाशिमला सर्वांत कमी पाऊस
यंदा विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी गडचिरोलीत सर्वाधिक म्हणजे १२४७.४७ मिमी पाऊस पडला. मात्र पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी अवघा ३७५.३ मिमी पाऊस पडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जानेवारीपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाटण तालुक्यातील पाथरपुंज या गावात नेहमी मोठा पाऊस होतो. यंदाही या ठिकाणी विक्रमी पाऊस झाला आहे. मात्र, हे पाणी कोयना धरणात जमा होत नाही.
- संजय डोईफोडे, अधीक्षक अभियंता, कोयना धरण विभाग