कोल्हापुरात आघाडीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: November 4, 2015 02:40 AM2015-11-04T02:40:50+5:302015-11-04T02:40:50+5:30
महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा टाकत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसकडे महापौरपद
कोल्हापूर : महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा टाकत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसकडे महापौरपद राहणार असून, उपमहापौरपद हे राष्ट्रवादीकडे असेल.
महापालिका निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर होताच, काँग्रेस हाच सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला, पाठोपाठ राष्ट्रवादीने १५ जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे या दोन पक्षांची आघाडी होणार, हे जवळ-जवळ स्पष्टच झाले.
मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. त्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रल्हाद चव्हाण व राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, तसेच अन्य नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.
पहिल्या वर्षी काँग्रेसचा महापौर करण्यावर सहमती झाली. त्यानंतर उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला.
काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने पदांच्या बाबतीत काँग्रेसला झुकते माप देण्यावर दोन्ही पक्षांत सहमती झाली, परंतु कोणती पदे कोणत्या पक्षाने घ्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
एकूण जागा ८१
नव्या सभागृहातील
काँग्रेस-राष्ट्रवादीचे बलाबल
काँग्रेस २७
अपक्ष २
राष्ट्रवादी काँग्रेस १५
एकूण सदस्यसंख्या४४
काँग्रेस व राष्ट्रवादी यांची ‘नैसर्गिक मैत्री’ असून, गेल्या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्तेत राहून मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे यावेळीही या दोन्ही पक्षांनी एकत्र राहून विकासकामे करावीत, असाच जनतेचा कौल आहे.
- आमदार डॉ. पतंगराव कदम, काँगे्रस नेते
सध्या आम्ही अपूर्र्ण कामे पूर्ण करण्यावर जोर देणार आहोत. जनतेला दिलेल्या अजेंड्यानुसार कामे केली जातील.
- सतेज पाटील, माजी राज्यमंत्री, काँग्रेस नेते
आम्ही कोल्हापुरात एकत्र आघाडी केली, म्हणून विदर्भाचे मुख्यमंत्री कोल्हापूरवर अन्याय करतील, निधी देणार नाहीत, पण राज्य व केंद्र सरकारकडून निधी खेचून आणण्यात आम्ही यशस्वी होऊ.
- हसन मुश्रीफ, माजी मंत्री,
राष्ट्रवादी काँग्रेस नेते