मराठवाड्यात झाले सर्वाधिक उलटे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:02 AM2020-07-27T06:02:11+5:302020-07-27T06:02:25+5:30
योगेश बिडवई। लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, ...
योगेश बिडवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, पुण्यासह शहरी भागातून निमशहरी व छोट्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उलटे स्थलांतर झाले असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. संबंधित सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उत्तरदात्यांपैकी मराठवाड्यातील ५३ टक्के कामगार गावी परतल्याचे अभ्यासातून समोर आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सार्वजनिक धोरण आणि लोकशाही शासन व्यवहार अभ्यास केंद्र आणि द युनिक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत अभ्यास करण्यात आला. मागास-अविकसित जिल्ह्यांतील अर्थव्यवस्था रोजगार पुरवण्यासाठी सक्षम नसल्याने मजूर मोठ्या शहरांत विविध असंघटित क्षेत्रांत काम करतात. सहाव्या आर्थिक गणनेनुसार राज्यातील एकूण रोजगारांपैकी सुमारे ७0 टक्के रोजगार हा मुंबई व उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या शहरी भागांतच केंद्रित झाला आहे. मात्र लोकसंख्येची घनता अधिक असल्याने हा भागच मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित बनल्याने ठप्प झाला.
मुंबई, ठाणे परिसरातून गावी परतलेले सर्वाधिक कामगार कोकण आणि पुणे, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.
पुणे जिल्ह्यातून मराठवाड्यात सर्वाधिक कामगार परतले.
शहरांमध्ये अनेकांना फुटकळ रोजगार मिळतो, ही वस्तूस्थिती कोरोनामुळे समोर आली. संरक्षित स्वरुपाचा रोजगार नसल्याने तो गेल्यावर लोकांना गावी परतले लागले. गावातही शेतीखेरीज इतर चांगल्या रोजगाराच्या संधी नाहीत. शहरी रोजगार हमी योजनेची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहेत. कामगारांना सामाजिक सुरक्षा देणे गरजेचे आहे.
- प्रा. राजेश्वरी देशपांडे, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
मराठवाड्यातील स्थलांतरित आकडेवारी पाहता त्यातूनच येथील सामाजिक आणि आर्थिक अस्वस्थता समोर येते. शेतीक्षेत्रातील पेच आणि रोजगार संधीअभावी मागास जिल्ह्यातून स्थलांतर होत आहे. ग्रामीण भाग, शेतीच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरी केंद्रित विकासाच्या विकेंद्रिकरणाची आवश्यकता आहे.
- डॉ. विवेक घोटाळे, कार्यकारी संचालक, द युनिक फाउंडेशन, पुणे