‘जीवनदायी योजने’अंतर्गत कामोठेत सर्वाधिक उपचार
By admin | Published: April 6, 2017 02:38 AM2017-04-06T02:38:04+5:302017-04-06T02:38:04+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंर्तगत २०१२-१७ या कालावधीत तब्बल चार हजार ५२३ रुग्णांवर सात हजार ९२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत
आविष्कार देसाई,
अलिबाग- रायगड जिल्ह्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत २०१२-१७ या कालावधीत तब्बल चार हजार ५२३ रुग्णांवर सात हजार ९२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यासाठी सरकारने भरघोस असे २१ कोटी ३० लाख रु पये खर्च केले आहेत. राजीव गांधी योजनेंर्तगत कामोठे येथील एमजीएम रु ग्णालयात सर्वाधिक उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी खरोखरच जीवनदायी ठरले आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर २०१४ मध्ये योजनेची सुरुवात झाली. ८ आॅगस्टला २०१४ रोजी नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि सरकार यांच्यामध्ये त्याबाबतचा करार झाला आहे. ज्या नागरिकांकडे पिवळी, केशरी, अंत्योदय योजनेतील रेशन कार्डेआहेत, त्या सर्वांच्या विम्याची रक्कम केंद्र सरकार भरते. कार्डावर ज्यांची नावे आहेत ते या उपचार खर्चास पात्र ठरतात. दीड लाख रुपयांपर्यंत ही मर्यादा असली तरी किडनीवरील उपचार खर्चासाठी अडीच लाख रुपयापर्यंत रक्कम वाढविण्यात आली आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, रायगड, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांत ही योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत सरकारने वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न आणि रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाची माहिती एकत्रित केलेली आहे. त्या कुटुंबाचा आरोग्य विमा सरकारने रक्कम भरून उतरविला आहे. सध्या मोठ्या रु ग्णालयात ज्यांनी आरोग्य विमा उतरवला आहे, त्यांच्यावर कॅशलेस उपचार होतात. पण बहुतेक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांनी अद्याप विमा उतरविला नाही. त्यामुळे ते उपचाराच्या खर्चाच्या भीतीने मोठ्या खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाहीत.