कोकणात अतिवृष्टीचा इशारा; रायगडला पावसाने झोडपलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:30 PM2017-08-28T16:30:24+5:302017-08-28T16:31:45+5:30
सोमवारी सकाळी आठ वाजता हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने आपत्ती नियंत्रण यंत्रणांनी सर्वत्र सतर्कतेचा इशारा दिला आहे.
- जयंत धुळप
अलिबाग, दि. 28- शुक्रवारी गणेश आगमनाच्या दिवशीच रायगड जिल्ह्यात पावसाच्या झालेल्या पुनरागमनाने रुपांतर गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसात झाल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावर पावसाचे विरझण पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारी सकाळी आठ वाजता हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने आपत्ती नियंत्रण यंत्रणांनी सर्वत्र सतर्कतेचा इशारा देवून आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज केली आहे. हवामान खात्याने जिल्हा प्रशासनांना कळविलेल्या हवामान अंदाजानूसार, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून पुढील 24 तासात तर 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्या पासून कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्याच्या प्रमुख नद्यांच्या जलपातळीत वाढ
रायगड जिल्ह्याच्या प्रमुख नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात कुंडलिका नदी क्षेत्रात कोलाड येथे 71 मिमी पावसाची नोंद झाली असून डोलवहाळ येथे या नदीची जलपातळी 22.65 मीटरला पोहोचली आहे. कुंडलिका नदीची संभाव्य धोकादायक पूर पातळी 23.95 मीटर आहे. अंबा नदी क्षेत्रात उन्हेरे येथे 40 मिमी पावसाची नोंद झाली असून नागोठणो येथे नदी जलपातळी 5.90 मिटरला पोहोचली आहे. अंबा नदीची संभाव्य धोकादायक पूर पातळी 9 मीटर आहे. सावित्री नदी क्षेत्रात महाड येथे 34.50 मिमी पावसाची नोंद झाली असून महाड येथे जलपातळी 4 मीटरला पोहोचली आहे. सावित्री नदिची संभाव्य धोकादायक पूर पातळी 6.50 मीटर आहे. पाताळगंगा नदी क्षेत्रात कलोते-मोकाशी येथे 63 मिमी पावसाची नोंद झाली असून लोहप येथे नदी जलपातळी 19.40 मिटरला पोहोचली आहे. पाताळगंगा नदीची संभाव्य धोकादायक पूर पातळी 21.52 मिटर आहे. उल्हास नदीच्या क्षेत्रात अवसरे येथे 61 मिमी पावसांची नोंद झाली असून कर्जत येथे नदी पातळी 46.10 मीटर झाली आहे. उल्हास नदीची संभाव्य धोकादायक पूर पातळी 48.77 मीटर आहे. गाढी नदी क्षेत्रातील पनवेल येथे 60 मिमी पावसाची नोंद झाली असून पनवेल येथे नदीची जल पातळी 2.80 झाली आहे. संभाव्य धोकादायक पूर पातळी 6.55 मिटर आहे.
भिरा धरणातून 20.800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग
रायगड जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात 65.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 1 जून 2017 पासून या धरण क्षेत्रत एकूण 4209.20 मिमी पाऊस झाला आहे. धरणाची जलपातळी नियंत्रणात ठेवण्याकरीता धरणाच्या तिन दरवाज्यांपैकी गेट क्र.1 हे 25 सेमी उघडण्यात आले आहे. यातून एकूण 20,800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला असल्याची ,रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड उपकार्यकारी अभियंता कार्यालयाच्या सूत्रंनी दिली आहे. भिरा धरणाचा संकल्पित एकुण जलसाठा क्षमता 9.090 दलघमी आहे तर उपयूक्त जलसाठा 4.755 दलघमी आहे. सोमावारी सकाळी आठ वाजता धरणातील प्रत्यत्र जलसाठा 4.14 दलघमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सुत्रंनी सांगीतले. दरम्यान रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागांतर्गत येणा:या 28 धरणांपैकी 23 धरणो पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
चोवीस तासात पेण येथे सर्वाधिक 100 मिमी पावसाची नोंद, भातशेती अडचणीत येण्याची शक्यता
सोमवारी सकाळी संपलेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात पेण येथे सर्वाधिक 100.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उवर्रित ठिकाणी उरण-96,रोहा-88, पोलादपूर-82, खालापूर-80,माणगांव-75, पनवेल-67,म्हसळा-64.20, तळा-59, महाड-54, कर्जत-51, सुधागड-51, अलिबाग-45, मुरुड-36, श्रीवर्धन-26 आणि गिरिस्थान माथेरान 51.50 मिमी पावसांची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्हयातील भातशेती मध्ये पावसाचे पाणी साचून राहील्याने भात शेती अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.