राज्यात हायअलर्ट...
By admin | Published: January 26, 2016 03:02 AM2016-01-26T03:02:27+5:302016-01-26T03:02:27+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करावा. संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत सुमारे ३० हजार पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले असल्याचे आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले.
इस्लामिक स्टेट (इसिस) या अतिरेकी संघटनेने देशातील प्रमुख ठिकाणी घातपात करण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. संघटनेशी सहभागी असलेल्यांची धरपकड करण्यात आलेली आहे. तरीही प्रजासत्ताक दिनी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आदेश राज्याचे पोलीस प्रमुख प्रवीण दीक्षित यांनी दिलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणारा प्रजासत्ताक सोहळा उत्साहात साजरा करताना नागरिकांनी सभोवतालच्या परिस्थितीबाबत सजगता बाळगावी, कोणत्याही अफवांना बळी पडू नये, संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबत तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. मुंबईतील सर्व महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर व उपनगरात सुमारे ३० हजार पोलीस तैनात ठेवण्यात आले असल्याचे आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रेल्वे पोलीस सज्ज
प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचे
सावट पाहता रेल्वे पोलिसांकडूनही सतर्कता बाळगण्यात आली आहे. जवळपास ७ हजार आरपीएफ, जीआरपी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील स्थानकांवर तैनात करण्यात आले आहेत.
उपनगरीय लोकल मार्गांवर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि जीआरपीकडून सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. रेल्वे कमांडो, श्वानपथक, बॉम्बशोधक पथक रेल्वे पोलिसांकडून तयार ठेवण्यात आले आहे.
प्रत्येक स्थानकाची तपासणी करतानाच सामानाची आणि संशयित व्यक्तींची कसून तपासणी केली जात आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, सीएसटी, कल्याण तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी आणि बोरीवली स्थानकात अधिक दक्षता घेण्यात आली आहे.
फेरीवाल्यांना हटविले
स्थानक आणि हद्दीतून फेरीवाल्यांनाही हटविण्यात आले आहे. तसेच संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत.
- आनंद झा,
पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ
विभागीय सुरक्षा आयुक्त
बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथके स्थानकांवर तैनात करण्यात आली आहेत.
- सचिन भालोदे,
मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त