राज्यभर राजकीय नामांकनांबद्दल प्रचंड उत्सुकता!

By admin | Published: March 29, 2017 04:12 AM2017-03-29T04:12:11+5:302017-03-29T04:17:29+5:30

महाराष्ट्राचे जनजीवन व्यापून टाकणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांमधून कोट्यवधी वाचक कोणाच्या बाजूने

Highly curious about state-of-the-state nominations! | राज्यभर राजकीय नामांकनांबद्दल प्रचंड उत्सुकता!

राज्यभर राजकीय नामांकनांबद्दल प्रचंड उत्सुकता!

Next

 मुंबई : महाराष्ट्राचे जनजीवन व्यापून टाकणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांमधून कोट्यवधी वाचक कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरच्या या वर्षीच्या पुरस्कारांसाठीचे मतदान संपण्याला आता काहीच तास शिल्लक राहिले आहेत. एकूण १४ विविध क्षेत्रांत हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. लोकमतच्या या पुरस्कारांसाठी ज्यांचे नामांकन झाले, ते सगळेच एकापरीने विजेतेच आहेत. पण लोकमताचा कौल आणि सन्माननीय ज्युरी मंडळाचा फैसला कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

विविध नामांकनांपैकी सगळ्यात जास्त उत्सुकता राजकीय नामांकनांविषयी निर्माण झाली आहे. यात कोण बाजी मारणार ही चर्चा जोरदार रंगली आहे. ‘प्रभावी राजकारणी कोण?’ या विभागात सहा अनुभवी मान्यवरांचा समावेश आहे. तर ‘कोणाकडून आहेत अपेक्षा?’ या विभागात पाच मान्यवरांचा समावेश आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करता करता राजकारणात आलेले, वन, वन्यजीव आणि वनौपज यावर तळमळीने बोलणारे, जंगलांची खडानखडा माहिती, तोंडपाठ आकडेवारी आणि हातातील आयपॅडवर साठवलेली अगणित माहिती पटापट सांगणारे आणि २ कोटी ८२ लाख वृक्षांची विक्रमी लागवड करून दाखवणारे देशातील एकमेव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.
स्व. गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून राजकारणात प्रवेश करून, नंतर स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे तरुण नेतृत्व, सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध होणारे, संघर्षातून स्वत:ला घडविणारे नेतृत्व ही सर्वमान्य ओळख असणारे, आक्रमक राजकारणी व परळी मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे.
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावून सर्वांनाच चकित करून टाकणारे, राजकारणात दुर्मीळ असलेला स्पष्टवक्तेपणाचा स्वभावगुण मंत्रिपदावर असतानाही बाळगणारे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट. 
पराभवाची तमा न बाळगता राजकारणात पुनश्च हरिओम करणारे, पोलादी मनगटाचे म्हणून ओळख असलेले झुंजार नेते, पक्षभेद विसरून लोकांमध्ये प्रिय होण्याचे कसब असणारे, आपले राजकीय घराणे स्वत:पासून सुरू करणारे आणि राजकीय भूकंप सांगून होत नसतात, असे जाहीरपणे सांगणारे काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला लाभलेला पहिला मराठा नेता, संसद आणि विधिमंडळात प्रभावी कामगिरी, स्वत:च्या लोकमंगलच्या माध्यमातून सामाजिक, औद्योगिक, जलसंधारण, कृषी, शिक्षण क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणारे, ‘ज्याचा ७/१२ तो सोसायटीचा सदस्य’ हे क्रांतिकारी पाऊल उचलणारे पहिले सहकारमंत्री सुभाष देशमुख.
कोणताही राजकीय वारसा पाठीशी नसताना, धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय आयुष्याला सुरुवात करून, कॅबिनेटमंत्रिपदापर्यंत झेप घेतलेले ठाणे जिल्ह्यातील आघाडीचे नेते, मितभाषी, दिलेल्या शब्दाला जागणारे, बेरजेच्या राजकारणावर विश्वास असलेले अशी ओळख असणारे राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे.
या एकापेक्षा एक सरस असलेल्या सहा दिग्गजांमधून आपली पसंती मतांद्वारे व्यक्त करण्याची कसोटी जगाच्या पाठीवर पसरलेले लोकमतचे कोट्यवधी वाचक पार पाडत आहेत. त्यांचे बहुमत लक्षात घेऊन ज्युरींनी केलेली अंतिम निवड विजेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करेल. परिणामी आजमितीस निवडीची ही प्रक्रिया निवडणुकीइतकीच रंगतदार बनली आहे.
‘कोणाडून आहेत अपेक्षा?’ या गटात पाच मान्यवर आहेत. ज्यात यांचा समावेश आहे.
भाजपाला मुंबईत शिवसेनेच्या तुल्यबळ आणि शक्तिशाली बनविणारे आक्रमक आणि अभ्यासू नेते पाठीशी कोणताही राजकीय वारसा नाही, मुंबईच्या चाळीतील बालपण, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारे आशिष शेलार अथक मेहनत, अभ्यास आणि संघटन कौशल्याच्या जोरावर मुंबई भाजपाचा चेहरा बनलेले आ. आशिष शेलार.
भाजपाच्या तरुण, उत्साही आणि उदयोन्मुख नेत्या म्हणून पाहिले जाणाऱ्या, २०१४ साली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करत खासदार बनलेल्या, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मुंबईत आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या, ‘ग्लोबल सिटिझन फोरम’चा कार्यक्रम मुंबईत घडवण्यात पुढाकार घेणाऱ्या, ग्लोबल सिटिझन पहिल्यांदाच भारतात आणि मुंबईत आणणाऱ्या आणि त्याच कार्यक्रमात कोल्ड प्ले च्या तालावर तरुणाईचे भव्य संमेलनच घडविणाऱ्या खा. पुनम महाजन. 
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे लढवय्ये आमदार अशी राज्यभर ओळख असणारे, रुग्णसेवेला स्वत:चा स्थायीभाव बनविणारे, शोषित, पीडितांच्या मदतीला धावून जाण्यात धन्यता मानणारे, अपंगांचे प्रश्न, समस्या सोडविताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई किंवा हेतुपुरस्सर नियम आडवे आणले की, त्या अधिका-यांच्या अंगावर हात टाकण्यास मागेपुढे न पाहणारे आमदार म्हणजे बच्चू कडू .
प्रसिद्धीच्या झोतात न येता पक्ष वाढीसाठी झटणारा कट्टर संयमी शिवसैनिक अशी ओळख असणारे, कोणताही राजकीय वारसा पाठिशी नसताना विद्यार्थीदशेत राजकारणाचे पाठ गिरवत, राज्य पातळीवर नावलौकिक मिळवलेले दिलखुलास व्यक्तिमत्त्व, वरकरणी साधे वाटणारे पण वाहिन्यांच्या आणि एकूणच माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर शिवसेनेची टिच्चून वकिली करणारे, शिवसेनेच्या दृष्टीने अडचणीच्या वाटणाऱ्या प्रश्नांवरही खमकेपणाने पक्षाची बाजू मांडणारे अ‍ॅड. डॉ. आ. अनिल परब.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात भाजपाची मोठी वाढ करणारे, लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदा आणि आता जिल्हा परिषदेत भाजपाल एकहाती बहुमत मिळवून देणारे, पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची हूल मिळाली, तरी पंचायतराज अभियानचे अध्यक्षपद खेचणारे, पक्षांतर्गत दबदबा वाढवित, जिल्ह्यातील काँग्रेसेतर पहिले मंत्री ठरलेले, स्वजिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविणारे, दहापैकी ७ पंचायत समित्यांत कमळ फुलविणारे राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील  निलंगेकर. 
लोकमताचा कौल आणि ज्युरींची पसंती यातून निवड झालेल्या रत्नांचा गौरव सोहळा लोकमतच्या व्यासपीठावरून होणार आहे. या निवडीत सहभाग देण्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील वाचक आॅनलाइनद्वारे मतदान करत आहेत. यावर्षी मतदानामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून आपणही आपले मतदान येथे करु शकता - lmoty.lokmat.com

Web Title: Highly curious about state-of-the-state nominations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.