मुंबई शहरात वाढल्या अतिधोकादायक इमारती
By admin | Published: May 20, 2016 02:57 AM2016-05-20T02:57:09+5:302016-05-20T02:57:09+5:30
गतवर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींचा आकडा यंदा वाढला आहे़
मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींचा आकडा यंदा वाढला आहे़ तब्बल ७४० इमारती कोसळण्याच्या स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ त्यामुळे या इमारतीतील हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पावसाळ्यापूर्वी या इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे़
पावसाळ्यापूर्वी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे़ गेल्या वर्षी ५४२ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते़ यंदा मात्र हा आकडा वाढून तब्बल ७४० वर पोहोचला आहे़ सी १ श्रेणी म्हणजे अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये शहरात १४६, पूर्व उपनगरात २८६ आणि पश्चिम उपनगरात ३०८ इमारतींचा समावेश आहे़ या इमारती पावसाळ्यात कोसळण्याचा धोका आहे़
गेल्या वर्षी पालिकेच्या मालकीच्या धोकादायक इमारतींमधील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता़ मात्र या कारवाईला रहिवाशांकडून तीव्र विरोध झाला़ त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न यंदाही ‘जैसे थे’ आहे़ पालिकेने नोटीस पाठवून इमारत खाली करण्याचा इशारा या वर्षीही रहिवाशांना दिला आहे़ मात्र रहिवासी अन्यत्र स्थलांतरित होण्यास तयार नाहीत़ (प्रतिनिधी)
>आमची जबाबदारी नाही़़. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची नोटीस देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे़ मात्र छप्पर जाण्याच्या भीतीने रहिवासी इमारत सोडण्यास तयार नाहीत़ त्यामुळे पालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे़ त्यानुसार धोकादायक इमारतींमधून रहिवासी स्थलांतरित होण्यास तयार नसल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास त्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे़