हायवे झाले दारूमुक्त

By admin | Published: April 2, 2017 03:17 AM2017-04-02T03:17:06+5:302017-04-02T03:17:06+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील हायवेवरील दारूची दुकाने, तसेच बार, पब आणि दारू विक्री करणारी रेस्टॉरंटस शनिवारी सकाळपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली

Highway was made of alcohol-free | हायवे झाले दारूमुक्त

हायवे झाले दारूमुक्त

Next

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील हायवेवरील दारूची दुकाने, तसेच बार, पब आणि दारू विक्री करणारी रेस्टॉरंटस शनिवारी सकाळपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी बार व दुकानमालकांनी स्वत:हूनच सकाळी दुकाने उघडली नाहीत, तर राज्याच्या बऱ्याच भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली.
विदर्भात महामार्गांवरील २,१२६ दारूची दुकाने बंद झाली असून, नागपूर जिल्ह्यातील ८७१ परमिट रूम, बार, विदेशी व देशी दारूची दुकाने आणि बीअर शॉपींना सील ठोकण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ४०० दारू दुकाने बंद करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी २१९ दुकाने बंद झाली. बुलडाणा जिल्ह्यातील ३६१, वाशिम जिल्ह्यातील १६२ आणि अकोला जिल्ह्यातील २२१ दुकानांना टाळे लावण्यात आले वा मालकांनी स्वत:च ती बंद ठेवली. जवळपास १४ अधिकाऱ्यांसह ५० जणांच्या चमूने शनिवारी विदर्भात कारवाई केली. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ८८७ दुकानांना टाळे लावण्यात आले. सांगली जिल्ह्यातील ६२४ दुकाने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील दुकानेही बंद होती. सोलापूर जिल्ह्यातील ८९५ पैकी तब्बल ६४६ बार, रेस्टॉरण्टस व दुकानांना टाळे ठोकण्यात आले़ यापैकी ५२३ दुकाने सोलापूर शहरातील आहेत़ पुणे शहरानजीकची जवळपास ८० टक्के दारूची दुकाने बंद झाली. शहरात महामार्गांलगत १९५० बार असून, जवळपास पाचशे वाइन्स शॉप आहेत. त्यातील केवळ २० टक्केच आता सुरू राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली. कोकणातील दुकानेही सील करण्यात आली. रत्नागिरीतील २९४ तर सिंधुदुर्गात २३२ दुकानांना टाळे लागले.
अहमदनगर जिल्ह्यातील ८२५ पैकी ६७५ दुकाने बंद करण्यात आली. मराठवाड्यातही धडक मोहीम राबवून दुकाने बंद करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील ४९४, हिंगोली जिल्ह्यातील १६५ आणि परभणी जिल्ह्यातील २१६ दुकाने बंद करण्यात आली.


गोव्यात पहिल्यांदा बंद
पणजी : गोव्यातील ३ हजार २१० दारूची दुकाने शनिवारी बंदच होती. गोवा हे पर्यटन राज्य आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे ३ हजार २१० मद्यालये बंद राहाण्याचा अनुभव राज्याला प्रथमच येत आहे. या दुकानांना पाचशे मीटर अंतराच्या बाहेर स्थलांतर करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.

परवाने रद्द केलेले नाहीत
आम्ही दारूविक्रीचे परवाने रद्द केलेले नाहीत. महामार्गापासून ५०० मीटर अंतरापुढे बार
आणि दारूची दुकाने अन्यत्र हलविण्याची परवानाधारकांना मोकळीक आहे. दारूचा साठा नसलेल्यांना ‘नील’चे प्रमाणपत्र दिले जात आहे, तर बार व रेस्टॉरन्ट एकत्र असलेल्या ठिकाणी दारूच्या गोदामाला सील लावले आहे, असे राज्य उत्पादन शुल्क (नागपूर विभाग)च्या अधीक्षिका स्वाती काकडे म्हणाल्या.

हॉटेलमध्ये जाऊन मद्यपान करणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. केवळ ३० लोक दुकानांमधून मद्य खरेदी करतात. या निर्णयामुळे राज्यातील ८० टक्के बार व दुकाने बंद झाली आहेत. खरे तर वाइन आणि इतर मद्य असा फरक सरकारने केला पाहिजे, असे इंडियन ग्रेप असोसिएशन बोर्डाचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितले.

खान्देशात नंदुरबार वगळता, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनुक्रमे ६०० आणि २६० दुकाने बंद करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य दुकाने महामार्गापासून ५०० मीटर दूर असल्याने, ती सुरूच राहिली. नाशिक जिल्ह्यातील ७८० दुकानांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Highway was made of alcohol-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.