महामार्गांवर वाहन चालकांचा ‘धिंगाणा’
By admin | Published: October 23, 2015 02:22 AM2015-10-23T02:22:19+5:302015-10-23T02:22:19+5:30
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर वाहन चालकांकडून वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाण प्रचंड असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या आठ महिन्यांत
मुंबई : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर वाहन चालकांकडून वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाण प्रचंड असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या आठ महिन्यांत (२0१५ आॅगस्टपर्यंत) नियम उल्लंघनाची ५३ लाख प्रकरणे महामार्ग पोलिसांकडे दाखल झाली आहेत. २0१४ साली एकूण ६४ लाख ४५ हजार ३२७ प्रकरणे दाखल झाली होती.
महामार्गांवर धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, जादा वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरलोड वाहतूक करणे, विनाहेल्मेट वाहन चालवणे, सिटबेल्ट न लावणे, डार्क ग्लास, विना लाईट वाहन चालवणे यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियम उल्लंघनाची प्रकरणे नोंदविण्यात येतात.
नियम उल्लंघनामध्ये विनाहेल्मेट वाहन चालविण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, ७ लाख ९२ हजार ५४५ प्रकरणे महामार्ग पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहेत. त्याखालोखाल वाहनांवरील डार्क ग्लासच्या उल्लंघनाची प्रकरणे असून, त्याविरोधात २ लाख ६२
हजार ३६६ प्रकरणे दाखल
झाली आहेत. महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांकडून नो पार्किंगमध्ये पार्किंग केली जात असून, त्याविरोधातही तब्बल ९ लाख ६0 हजार केसेस दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.
५८ कोटींचा दंड वसूल
२0१५मध्ये वाहन चालकांविरोधात केलेल्या कारवाईत ५८ कोटी ४ लाख ७५ हजार ४९९ रुपये दंड वसूल झाल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. मागील वर्षी ७४ कोटी ५३ लाख २५ हजार ९0४ कोटी रुपये दंड वसूल केला होता.
मराठी नंबर प्लेटविरोधात कारवाई
मराठी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांविरोधातही महामार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. २0१४मध्ये १६ हजार ३७ तर २0१५मध्ये ५ हजार ८४५ वाहनांविरोधात कारवाई झाली आहे.