मूल होत नसल्याने केले अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2015 02:36 AM2015-12-06T02:36:57+5:302015-12-06T02:36:57+5:30
अपहरण म्हणजे खंडणीसाठी छळ. मात्र नंदिनी शर्मा या चार वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणात एका वेगळ्याच नात्याची गुंफण समोर आली आहे. सात महिन्यांपूर्वी घरासमोर भावडांसमवेत
नाशिक : अपहरण म्हणजे खंडणीसाठी छळ. मात्र नंदिनी शर्मा या चार वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणात एका वेगळ्याच नात्याची गुंफण समोर आली आहे. सात महिन्यांपूर्वी घरासमोर भावडांसमवेत खेळताना नंदिनी गायब झाली होती.
नंदिनीच्या अपहरणानंतर तिचे कुटुंबीय हवालदिल झाले होते. सहा महिन्यांनी चिमुकल्या नंदिनीचा शोध लागला. मूल होत नसल्याने एका मातेने नंदिनीला मुलगी म्हणून सांभाळण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले होते.
पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा उलगडा केला. १५ मे २०१५ रोजी पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तींनी नंदिनीचे अपहरण केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर तिचे वडील महेंद्र शर्मा यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेड तपासल्यानंतर त्यात पांढऱ्या रंगाची गाडी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली.
घटनेच्या आदल्या दिवशीचे (१४ मे) फूटेज तपासल्यानंतर संबंधित गाडी अंबड परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार चौकशी केली असता गाडीचे मॉडेल सांगून गाडीत गणपतीची मूर्ती असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संपूर्ण राज्यात गाडीचा शोध घेण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान’नावाने पोलीस पथक तयार केले. अखेर दोन महिन्यांपूर्वी नाशिकमधीलच एका मॉलमध्ये ही गाडी अनेकांनी पाहिली. गंगापूर गाव व चार दिवसांपूर्वी गंगापूर रोड परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये एका महिलेसोबत नंदिनी फिरताना बघितल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला आणि तिचा शोध लावला. (प्रतिनिधी)