राज्यातील टेकड्या होणार हिरव्यागार
By admin | Published: October 7, 2015 01:45 AM2015-10-07T01:45:00+5:302015-10-07T01:45:00+5:30
राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांंवर वृक्षसंवर्धन करण्याची योजना राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत
- राजानंद मोरे, पुणे
राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांंवर वृक्षसंवर्धन करण्याची योजना राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळे आणि देवस्थाने असलेल्या टेकड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या माध्यमातून टेकड्यांवर होणारे अतिक्रमण रोखले जाणार आहे.
सध्या राज्यातील ३०७ लाख हेक्टर भौगालिक क्षेत्रापैकी ६१.३५ लाख हेक्टर जमीन वृक्षाच्छादित आहे. हे प्रमाण साधारण २० टक्के असून, धोरणानुसार हे क्षेत्र किमान ३३ टक्के असणे आवश्यक आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये आता आणखी एका योजनेची भर पडली आहे.
पहिल्या टप्प्यात १२ टेकड्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने निधीही मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्याचे काम ८ ते १० दिवसांत सुरू होईल. पुढील वर्षी पावसाळ््यापूर्वी वृक्षारोपणाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या आर्थिक वर्षांसाठी शासनाने २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २०१६-१७ या वर्षासाठी ६.२० कोटी, २०१७-१८ साठी ४४० कोटी, २०१८-१९ साठी २.६० कोटी तर २०१९-२० वर्षासाठी १.८० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
जुन्या योजनांप्रमाणे सामाजिक वनीकरण विभागाने या योजनांवर सध्या लक्ष केंद्रित केले आहे. या योजना नवीन असल्याने लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
- अतुलराज चढ्ढा, अपर महासंचालक, सामाजिक वनीकरण विभाग