सांगलीचा निहार हिमालयावर!
By admin | Published: September 25, 2015 10:43 PM2015-09-25T22:43:50+5:302015-09-25T22:43:50+5:30
निसर्गाशी सामना : उंच शिखरावर फडकविला तिरंगा
सांगली : हिमालयातील लहरी हवामान, उणे चार अंशापेक्षा कमी तापमान, सोसाट्याचा वारा, सलग दोन दिवस होणारी हिमवृष्टी, कोसळणारे हिमकडे, अशा अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित धोक्यांचा सामना करीत अकरा जणांच्या पथकाने हिमालयातील माऊंट नून-कुन या २३ हजार फूट उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. या पथकात सांगलीच्या निहार सोले या तरुणाचाही समावेश होता.
माऊंट कुन हे चढाईसाठी सर्वात उंच व तांत्रिकदृष्ट्या खडतर शिखर मानले जाते. भारतीय नौसेनेचे नऊ गिर्यारोहक व देशातील उत्कृष्ट दोन गिर्यारोहक अशा अकरा जणांचे पथक या मोहिमेसाठी गेले होते. यात सांगलीतील निहार सोले यांचा समावेश होता. चढाई करताना बेस कॅम्पसह संपूर्ण मार्गावर चार कॅम्प लावले होते. यात सर्वात शेवटचा कॅम्प २० हजार ८८० फूट उंचीवर होता. शेवटच्या टप्प्यासाठी सात जणांच्या टीमने ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री चढाईला सुरूवात केली. तेव्हा २५ अंशापेक्षाही कमी तपमान होते. हिमदंश, दमछाक व बर्फाचे वादळ यामुळे तीन जणांनी चढाई अर्धवट सोडली. निहार व उर्वरित तिघांनी तशा परिस्थितीही चढाई कायम ठेवताना सकाळी साडेआठ वाजता शिखरमाथा गाठून तिरंगा फडकविला.
याबाबत निहार सोले म्हणाले की, खडतर शारीरिक व मानसिक सराव आणि कुटुंबियांची साथ यामुळेच सर्वात उंच शिखर चढाईत यश मिळाले आहे. यापुढे सर्वोच्च माऊंट एव्हरेस्टवर चढाईचा मानस आहे. (प्रतिनिधी)