‘हिंद केसरी’, ‘महाराष्ट्र केसरी’ मानधनाविना
By admin | Published: April 9, 2017 12:27 AM2017-04-09T00:27:34+5:302017-04-09T00:27:34+5:30
राज्यातील सात ‘हिंद केसरीं’सह ३०हून अधिक ‘महाराष्ट्र केसरी’ मल्लांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. हे मानधन महिन्याच्या महिन्याला मिळावे याकरिता
- सचिन भोसले, कोल्हापूर
राज्यातील सात ‘हिंद केसरीं’सह ३०हून अधिक ‘महाराष्ट्र केसरी’ मल्लांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. हे मानधन महिन्याच्या महिन्याला मिळावे याकरिता अर्ज-विनंत्या करूनही सरकार या नामवंत मल्लांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहे.
हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना राज्य शासन प्रतिमहिना ६ हजार रुपये इतके मानधन देते. मात्र, हे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून मल्लांना मिळालेले नाही. मानधन मिळत असलेले अनेक मल्ल वृद्धापकाळाकडे झुकले असून, त्यांचा निर्वाह या तुटपुंज्या मानधनावरच अवलंबून आहे. राज्याचे क्रीडा मंत्रालयही या मल्लांची दाद घेईनासे झाल्याने कैफियत मांडायची तरी कोणापुढे, असा प्रश्न या मल्लांना पडला आहे. सध्याची महागाई लक्षात घेता मानधन हिंद केसरी मल्लांना किमान ३० हजार, तर महाराष्ट्र केसरी मल्लांना प्रतिमहिना किमान २५ हजार इतके मिळावे, अशी मल्लांची मागणी आहे.
मोरेंना मानधनच नाही
सांगलीतील भगवान मोरे यांनी धुळे येथे १९६२ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. मात्र, अद्यापही त्यांना मानधन मिळाले नाही. विशेष म्हणजे, हयात असणारे ते ज्येष्ठ मल्ल आहेत.
हिंद केसरी : राज्यात श्रीपती खंचनाळे, स्वर्गीय मारुती माने, दीनानाथसिंहजी, गणपतराव आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, दादू चौगुले, विनोद चौगुले, योगेश दोडके, अमोल बराटे, अमोल बुचडे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र केसरी : दिनकर पाटील, भगवान मोरे, गणपत खेडकर, दीनानाथसिंह, चंबा मुत्नाळ, दादू चौगुले, लक्ष्मण वडार, हिरामण बनकर, इस्माईल शेख, विष्णू जोशीलकर, गुलाब बर्डे, तानाजी बनकर, रावसाहेब मगर, अप्पालाल शेख, उदयराज यादव, संजय पाटील, शिवाजी कैकण, अशोक शिर्के, गोरख सिरक, धनाजी फडतारे, विनोद चौगुले, राहुल काळभोर, मुन्नालाल शेख, दत्ता गायकवाड, सय्यद चौस, अमोल बुचडे, चंद्रहार पाटील, विजय बनकर, समाधान घोडके, नरसिंग यादव, विजय चौधरी यांचा समावेश आहे.
पद्मश्री, पद्मभूषण द्या... : हरियाणा, पंजाब येथील अनेक ज्येष्ठ मल्लांना त्यांच्या कामगिरीनुसार पद्मश्री, पद्मभूषण अशा सर्वोच्च सन्मानाने केंद्र सरकारने सन्मानित केले. महाराष्ट्रातही हिंद केसरी स्वर्गीय मारुती माने, हिंद केसरी व अर्जुन पुरस्कार विजेते गणपतराव आंदळकर यांचे योगदान राज्य सरकारने लक्षात घेऊन इतर राज्यांप्रमाणे त्यांचीही पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसाठी शिफारस करावी. - दीनानाथसिंह, हिंद केसरी, कोल्हापूर