हिंदी-चिनी व्याही व्याही! ‘जोंगोव्ह’ची रुई-खानदेशाची सूनबाई!!
By admin | Published: April 4, 2017 08:42 AM2017-04-04T08:42:14+5:302017-04-04T08:42:39+5:30
चहावाला झाला ‘मर्चंट आॅफ चीन : आव्हाण्याच्या बॉबीचा थक्क करणारा प्रवास
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 4 - आंतरराष्ट्रीय विवाह ही आता नवीन बाब राहिलेली नाही. मात्र भारत आणि चीन या दोन देशातील विवाहसंबंधाच्या घटना मात्र अपवादात्मक आहे. चोपड्यात चहा विक्री करीत असताना ‘मर्चंट आॅफ चीन’ ठरलेल्या जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील बनवारी (बॉबी) जाधव व जोंगोव्ह प्रातांतील रुईबाई यांच्या विवाहानंतर ‘हिंदी-चीनी व्याही व्याही’चा अनुभव आला. नव्याने निर्माण झालेल्या या नात्यातून आव्हाण्यातील एका गुर्जर तरुणाला चीनकडून वधू तर मिळालीच त्यासोबत चीनचे नागरिकत्वही मिळाले आहे.
बॉबी आणि रुईचे जाईजुई
जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आव्हाणे येथील बॉबी श्रीराम जाधव हा झी-महासेलमध्ये सेल्समन म्हणून कामाला लागला. मालक मेहता यांनी चीनमधील गोन्जोव इथं सेल लावला. बॉबी विश्वासातील असल्याने त्याला काउंटर सांभाळण्यासाठी नेले. पुढे मेहतांनी तिथंच दुसरा व्यवसाय सुरु केला. बॉबी आणि आणखी तीन जण त्या ठिकाणी होते. बॉबी आता अस्खलित चिनी भाषा बोलू लागला होता. दरम्यान रुई व्यवस्थापनातील पदवीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मेहतांच्या कार्यालयात रुजू झाली. इथंच बॉबी आणि रुईचे जाईजुई झाले.
बॉबीचा मर्चंट आॅफ चीनचा प्रवास
मेहतांनी पुढे इथल्या व्यवसायातील इंटरेस्ट काढून घेत बॉबीकडे जबाबदारी सोपविली. साईबाबांचा भक्त असलेल्या बॉबीने ‘साई’ नावाने चिनी ट्रेडिंग कंपनी सुरु केली. आता कंपनी रुईच्या नावावर आहे. म्हणून रुई हे कंपनीचे नाव आहे. साई हे नाव कंपनीतून काढून बॉबी आणि रुईच्या छकुल्याला दिले. बॉबीला आता रितसर चीनचे नागरिकत्व मिळाले आहे.
हिंदी-चिनी व्याही-व्याहीला दोन्ही कुटुंबाचा विरोध
जाधव हे अगदी पारंपरिक स्वरुपाचे गुर्जर. दोघांच्या लग्नाला चीनमधून विरोध होता. रुईचं आजोळचं घराण सामंतांचं. रुईचे मामाही त्यामुळे विरोधात होते. गुर्जर कोण असतात, काय करतात हे सगळं या मामानं इंटरनेटवर सर्च केलं. रुई व बॉबी एकमेकांशिवाय जगायचं नाही म्हणताहेत म्हणून नाईलाजाने होकार दिला.
रुईचा कुळाचारात हौसेने सहभाग
लग्नाआधीही एकदा रुई इथं जळगावला येऊन गेली. तावसे, मोहिदे, लोणी, आव्हाणे ही गुर्जरांची गावे फिरून आली. तिने आव्हाण्यात सगळ्या कुळाचारांत उत्साहाने सहभाग घेतला. ‘कानबाई-रानबाईचे रोट, आखाजीचे झोके, कळण्याच्या भाकरी असं सगळं तिने जाणून घेतलं. आव्हाण्याजवळील ‘डिकसाई’ हे गावाच नाव ऐकून आपण चीनमध्ये आहोत असं ती म्हणाली.
बॉबी म्हणजे जोंगोव्हमधलं जळगाव
बॉबी आणि रुईच्या लग्नापूर्वी बॉबीचे मोठे बंधू ज्ञानेश्वर हे तीन वर्ष चीनला राहून आले. काही दिवसांपूर्वी जळगावातून मिलिंद थत्ते आणि रुपेश महाजन हे साऊंड इंजिनिअरींग तंत्राच्या माहिती संदर्भात चीनला गेले होते.
तिथे जळगावचे म्हणून बॉबीनेच त्यांची विचारपूस केली. किरण बच्छाव यांनादेखील हाच अनुभव आला. जळगावातून जोंगोव्हला जे कुणी आले, त्यांच्यासाठी बॉबी म्हणजे जोंगोव्हमधलं जळगाव आहे.
चीन जवान वांग नंतर बनवारी बॉबी
दहा वर्षांपूर्वी भारताने घुसखोर म्हणून कैद केलेला वांग हा चिनी जवान अलीकडेच (मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये) कोर्टाकडून सुटला आहे. याच ठिकाणी लक्ष्मी या भारतीय महिलेसह लग्नाच्या बेडीत तो अडकला. विष्णू या लहान मुलासह वांग आता सपत्निक चीनला रवाना झालेला आहे. दुसऱ्या घटनेत आव्हाण्याचे बनवारी (बॉबी) जाधव हे आपल्या रुई चँग या चिनी पत्नी आणि साई या छकुल्यासह चीनला रवाना झाले आहेत.
बॉबीचे बनवारी नामकरण
बॉबी यांचे वडील श्रीराम जाधव यांची चोपड्यात डॉ.दीपक पाटील यांच्या दवाखान्यासमोर चहाची टपरी होती. त्यांना ज्ञानेश्वर व बॉबी ही दोन मुले आहेत. श्रीराम यांचा एक उत्तर भारतीय मित्र होता. बॉबीचं नामकरण बनवारी असं त्यानेच केलं. बनवारी म्हणजे श्रीकृष्ण. मात्र नामसंस्कारात जसं प्रादेशिक औदार्य होतं, तसं विवाह संस्कारात नव्हतं!
चिनी मामाच्या मते ‘मंगोलाइड’ श्रेष्ठच
वांशिक दृष्ट्या गुर्जर हे इंडो आर्यन आहेत. रुई ही वांशिक दृष्ट्या ‘मंगोलाइड आणि त्यातही सामंत घराण्यातली. रुईच्या मामाला इंटरनेटवरून माहिती घेत असताना चीनमधून भारतात आलेल्या युवान श्वांगनं गुर्जरांचा केलेला ‘किऊ-चे-लो’ हा उल्लेख आढळला. गुर्जर प्रतिहार वंशाचं साम्राज्य कन्नौजपासून गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र असं विस्तिर्ण होतं, अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्याने बॉबीला होकार दिला. वरचढ वंश आमचाच या म्हणण्यावर हा चिनी मामा आजही कायम आहे. बॉबी आणि रुई यांचे अपत्य साई हा रुईवर पडल्याने चिनी मामा आपल्या मतावर जास्तच ठाम झाला.