हिंदूंच्या सणांना नियमांचा अतिरेक नको
By admin | Published: July 12, 2017 04:57 AM2017-07-12T04:57:13+5:302017-07-12T04:57:13+5:30
हिंदूंचे सण आले की नियमांचे अडथळे तयार केले जातात.
मुंबई : हिंदूंचे सण आले की नियमांचे अडथळे तयार केले जातात. काहींना आरतीचा त्रास होतो त्यांना बांगेचा त्रास होत नाही. हिंदू सहिष्णू आहे म्हणून विरोधात बोलण्याची हिंमत होते. हिंदूंच्याही भावना लक्षात घ्या. नियमांचा आणि अडथळ्यांचा अतिरेक करू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव आणि दहीहंडीबाबत सुरू असलेल्या कोर्टबाजीवर नाराजी व्यक्त केली.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, उत्सव आयोजकांना व्यवस्थित सांगितले तर ऐकतात, दंडुक्याने काही होत नाही. उत्सव काळातही
आम्ही शांत राहायचे असेल तर स्मशानशांतता काय वाईट आहे. एकही गणेशोत्सव मंडळ अतिरेकाची पायरी गाठणार नाही याची मी हमी घेतो. पण तुम्ही नियम आणि अटींचा अतिरेक करू नका. शांतता क्षेत्राच्या मुद्द्यावर गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यंदा त्यांना भेटणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांना बाळासाहेबांची आठवण येत आहे. मी स्वत:ला बाळासाहेब समजत नाही, पण माझे शिवसैनिक तेच आहेत आणि बाळासाहेबांचे ते वाक्य सिद्ध करायला ते समर्थ आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा निषेध केला. आज शिवसेना काय करते, असे विचारणारे सध्या गुलाम अलीच्या गझला ऐकत आहेत, पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट मॅच पाहत आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला. क्रीडा आणि धर्म एकत्र आणू नका, असे सल्ले दिले जातात. आता धर्म आणि दहशतवाद एकत्र आला आहे. हे सगळे आता तेथे जाऊन सांगा. जमल्यास गोरक्षकांना पाठवा, असा चिमटाही उद्धव यांनी काढला.
उत्सवाचे महत्त्व ओळखून लोकमान्य टिळकांनी त्या काळी सणांची चळवळ केली. आवश्यकता संपल्यावर आपण त्याचा उत्सव केला. उत्सवात आपण एकत्र जमतो तसे पुढेही एकसंघ कसे राहता येईल याचा विचार आयोजकांनी करावा. उत्सवांमधून आरोग्याची चळवळ पुढे न्यावी, असे ठाकरे म्हणाले.