हिंदू महासभेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांचे निधन
By Admin | Published: October 12, 2015 01:43 AM2015-10-12T01:43:07+5:302015-10-12T01:43:07+5:30
हिंदुत्ववादाचा कट्टर पुरस्कार करणाऱ्या हिंदू महासभेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर (वय ६८) यांचे दीर्घ आजाराने रविवारी सायंकाळी सात वाजता शनिवार पेठेतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
पुणे : हिंदुत्ववादाचा कट्टर पुरस्कार करणाऱ्या हिंदू महासभेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर (वय ६८) यांचे दीर्घ आजाराने रविवारी सायंकाळी सात वाजता शनिवार पेठेतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातू,असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या ब्रेन टयुमरच्या आजाराने ग्रस्त होत्या.
हिमानी या गोपाळ गोडसे यांच्या कन्या आणि नथुराम गोडसे यांची पुतणी होत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायण सावरकर यांच्या त्या स्नुषा. हिमानी सावरकर यांचा जन्म १९४७ मध्ये पुण्यात झाला. महात्मा गांधी खूनप्रकरणी त्यांचे काका नथुराम गोडसे व वडील गोपाळ गोडसे यांना अटक झाली. त्यांच्या वडिलांची १८ वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाली. वास्तुविशारद म्हणून त्यांनी काही दिवस काम केले. त्यांनी २००० साली हिंदू महासभेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४ साली त्यांनी कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. २००८ मध्ये त्या हिंदू महासभेच्या अध्यक्षा झाल्या. अभिनव भारत या संघटनेच्याही अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी पुन्हा २००९ सालची विधानसभा निवडणूक लढविली होती.