हिंदुंनो, किमान दहा मुले जन्माला घाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 05:07 AM2016-12-26T05:07:38+5:302016-12-26T05:07:38+5:30
आज हिंदुत्व धोक्यात आले असून, हिंदुंची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर ‘हम दो, हमारे दो’ हे सरकारी आवाहन नजरेआड करीत,
नागपूर : आज हिंदुत्व धोक्यात आले असून, हिंदुंची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर ‘हम दो, हमारे दो’ हे सरकारी आवाहन नजरेआड करीत, एका हिंदू दाम्पत्याने किमान दहा अपत्य जन्माला घालणे आवश्यक आहे. त्यांचे पोेट कसे भरायचे, याची चिंता करू नका, त्यासाठी परमेश्वर समर्थ आहे, असे वादग्रस्त आवाहन ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी धर्मसंस्कृती महाकुंभाच्या धर्मपीठावरून केले.
तीन दिवसीय धर्मसंस्कृती महाकुंभाचा रविवारी समारोप झाला. या वेळी १११८ संतांच्या उपस्थितीत देशरक्षा, संस्कृतीरक्षेचा संकल्प करण्यात आला. स्वामी वासुदेवानंद यांनी हिंदुंना दहा मुले जन्माला घालण्याचे आवाहन केलेले असताना, त्याच व्यासपीठावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही काहीसा तोच सूर आळवला.
ते म्हणाले, आपल्याला अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल, तर आपल्या पाठीशी मोठी शक्ती असली पाहिजे. ती नसेल तर आपले कुणी ऐकणार नाही.
ती शक्ती पाठीशी उभी करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांचे समर्थन आवश्यक आहे. या महाकुंभाच्या निमित्ताने हा
संदेश देशभर जायला हवा, अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी या वेळी व्यक्त केली.
धर्माचार्यांचे योगदान गरजेचे - मुख्यमंत्री
भारताने नेहमीच जगाला चांगले विचार दिले आहेत. जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे. असे जागतिक नेतृत्व स्वीकारताना त्यात धर्माचार्यांचे योगदान गरजेचे आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राममंदिराचे पुनर्बांधकाम हा प्रत्येक हिंदूच्या स्वाभिमानाचा विषय आहे. परंतु अद्याप राममंदिराचे बांधकाम का होऊ शकलेले नाही, देशभरात गोहत्या आजही सर्रास सुरू आहे. ती का बंद होत नाही, असा खडा सवाल विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला. त्यांचा रोख केंद्र सरकारवर होता.
हिंदूंच्या आजच्या स्थितीबाबत बोलताना तोगडिया म्हणाले, या देशात हिंदूंची संख्या आधी ८६ टक्के होती. आज ती कमी होऊन ८० टक्क्यांच्या खाली आली आहे. उलट मुस्लिमांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यात दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या हिंदूंना निवडणूक लढवता येत नाही. मुस्लीम समाजाला असे बंधन कुणी घालत नाही. हिंदूंची संख्या अशीच वेगाने कमी होत राहिली तर पुढच्या शंभर वर्षात हिंदूच या देशात अल्पसंख्यक होतील, अशी भीतीही तोगडिया यांनी व्यक्त केली. देवांच्या नावावर केला जाणारा जातीभेद कुणालाच मान्य नाही. राम, कृष्ण, शंकराला कोणतीच जात नाही. ते सर्वांचे भगवान आहेत, असे या महाकुंभाचे राष्ट्रीय निमंत्रक जितेंद्रनाथ महाराज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)