हिंदुस्थानात हिंदूंनी सण-उत्सव साजरे करणं अपराध - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 08:09 AM2016-08-25T08:09:59+5:302016-08-25T08:13:35+5:30
हिंदूंनी त्यांचे सण-उत्सव साजरे करणे हाच मुळात हिंदूंच्या हिंदुस्थानात अपराध ठरत आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाच्या भुमिकेवर आणि कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - हिंदूंनी त्यांचे सण-उत्सव साजरे करणे हाच मुळात हिंदूंच्या हिंदुस्थानात अपराध ठरत आहे. दहीहंडीबाबतही तेच घडताना दिसत आहे. न्यायालयीन निर्णयामुळे गोविंदा मध्येच लटकले आहेत. गोविंदा पथकांच्या संतापात आम्ही सहभागी आहोत. अर्थात, हिंदूंनी संतापाचा स्फोट घडवून तरी काय फायदा? त्यांच्या न्यायाचा ‘मटका’ नेहमीच लटकलेला असतो असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाच्या भुमिकेवर आणि कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
लोकांनी निवडून दिलेले सरकार हात चोळत बसले आहे आणि न्यायालय राज्यकारभार करीत आहे. म्हणून मुंबईतील ओल्या व सुक्या कचर्याचे काय करायचे इथपासून ते दहीहंडीचे किती थर लावायचे इथपर्यंत न्यायालये फर्मान सोडत आहेत. जर राज्यकर्ते हुकूमशहा बनतात म्हणून टीका होत असेल तर न्यायालयांची हुकूमशाही तरी स्वीकारायची काय? हिंदूंचे सण-उत्सव आले की न्यायालयांतील मटकी तडकू लागतात व त्या तडकत्या मटक्यांतून काय बाहेर पडेल ते सांगता येत नाही. अर्थात शेवटी ‘यस मायलॉर्ड’ म्हणून न्यायालयाचे निर्णय आपण शिरसावंद्य मानीतच आलो आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
गोविंदा पथकांचा तो नेहमीचा जल्लोष यावेळी दिसेल काय, हा एक प्रश्नच आहे. अर्थात गोविंदा पथके नाराज झाली म्हणून त्यांनी घरात बसू नये. हिंदू एकजुटीचे विराट दर्शन यानिमित्ताने घडवावे. म्हणजे हिंदूंचा आपल्या सण-उत्सवांबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल. बरं, न्यायालयाने सुरक्षेचे सर्व उपाय योजूनच दहीहंडीचे मटके फोडावे असेही बजावले आहे. म्हणजे आता काय करायचे? अंगात चिलखत घालून थर लावावेत की बुलेटप्रूफ काचांचे पिंजरे लावून थर चढवायचे असा सलावही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
याप्रश्नी ज्या राजकीय पुढार्यांनी राजकीय ‘नाद’ केला तेही शेवटी जे काही असेल ते नियमानेच करा, शिस्त पाळा, चुकीचे काही करू नका, अशा समन्वयाच्या मार्गदर्शनी भूमिका घेत आहेत. कारण जनता संतापली असली तरी या संतापाचा कळवळा येऊन हिंदूंच्या सण-उत्सवांसंदर्भात राज्यपालांच्या सही-शिक्क्यांचा वटहुकूम निघण्याची शक्यता नाही. त्यासाठी महाराष्ट्रात फक्त भगव्या झेंड्याचे हिंमतबाज असे शिवसेनेचे एकहाती राज्यच असायला हवे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता देण्याचं आवाहनच केलं आहे.
सरकारे ही हिंदूंना न्याय देण्याबाबत शेपूट घालूनच काम करतात हा अनुभव नवा नाही. बालगोविंदांना उंच थरांवर चढवून त्यांचे जीव धोक्यात घालणे आम्हास मान्य नाहीच व न्यायालयाने घेतलेल्या या भूमिकेचे आम्ही स्वागतच करीत आहोत, पण थरांची उंची मोजण्यात मात्र चूकभूल झाली आहे. पुन्हा न्यायालयाच्या या निर्णयाने पोलिसांचे काम मात्र वाढवून ठेवले आहे. कोण किती थर लावून न्यायालयीन आदेशाचा भंग करीत आहे यासाठी गल्लोगल्ली पोलिसांना फिरावे लागेल. अतिरेकी, गुन्हेगार, चोर, चिलटे या काळात मोकाट सुटले तरी चालतील, पण गोविंदांवर मात्र पोलिसांची करडी नजर राहणार आहे. कारण ते पडले हुकुमाचे ताबेदार. तेव्हा त्यांना बोलून तरी काय फायदा? असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.