"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 21:21 IST2025-04-16T21:20:52+5:302025-04-16T21:21:18+5:30
"आपण वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही..."

"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
भारतीय जनता पक्ष. परवा हनुमान जयंती झाली, त्याआधी रामनवमी झाली. किती हिंदूंच्या घरात त्यांनी भेटी दिल्या? एका तरी हिंदूच्या घरी आले? पण यावेळी प्रथम देशातील ३२ लाख मुस्लीम कुटुंबियांना 'सौगाते मोदी'. त्यांच्याकडे पैसा बक्कळ आहे. म्हणजे भाजपने जो काही पैसा ओरबाडला, त्या पैशांतून मुस्लिमांच्या घरात 'सौगात' वाटतायत. म्हणजे, हिंदूंना दिली घंटा, यांना देतायत सौगात. आनंद आहे. पण हे कधी? हे मुस्लीम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्यासोबत आले, म्हणून तुम्हाला हे सर्व सुचत आहे. त्यापूर्वी काय करत होता? "बटेंगे तो कटेंगे". म्हणजे, महाराष्ट्रातल्या निवडणुकीत 'बटेंग तो कटेंगे' आणि बिहारमध्ये "बाटेंगे और जितेंगे". म्हणजे, भेटी वाटणार आणि मग जिंकणार. आता हिंदू-मुस्लीम, सगळ्या धर्मांनी सावध रहायला हवे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर हल्ला चढवला. ते नाशिक येथे पक्षाच्या निर्धार शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
ठाकरे म्हणाले, "त्यांनी (भाजप) एक अपप्रचार केला की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. अरे, मुस्लीम समाज आमच्यासोबत आला, का आला? कारण कोरोना काळात मी कधी जातीय भेदभाव केला नाही आणि मुख्यमंत्री असतानाही मी मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेला डाग लागू दिला नाही. सर्वांना समानतेने वागवले. आज भारतीय जनता पक्ष जे काही करत आहे, सांगा मला, कोणी हिंदुत्व सोडले? मी सोडले की, भाजपने सोडले? आपण वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही."
ठाकरे पुढे म्हणाले, "संपूर्ण दोन दिवसांतील त्यांची संसदेतील भाषणे तुम्ही ऐकलीत..., मला असे वाटते की, तोही एक कार्यक्रम करा की, त्या कार्यक्रमात अमित शहापासून ते सर्वांनी केलेली भाषणे ऐकवा. अमित शहा, राजनाथ सिंह, किरण रिजिजू, पियुष गोयल बसले होते आणि त्यांच्यासमोर नितीश कुमार यांचे खासदार ललन सिंह आणि तेलुगु देशमचे नेते जोरात सांगत होते, 'मुसलमानांच्या हिताचे रक्षण जनता दल (यु) करेल, टीडीपी करेल आणि हे लाचारीने खाली मान घालून हसत होते. कारण सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही जो सत्ता-जिहाद केला, कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेला दूर केले आणि मशिदीत जाणाऱ्या चंद्रबाबूंना तुम्ही सोबत घेतले आणि आम्हाला सांगता, आम्ही हिंदुत्व सोडले?" असा सवालही यावेळी ठाकरे यांनी भाजपला केला.
"मला नीट एकदा सांगा तरी, तुमचे हिंदुत्व आहे तरी काय? शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवले, ते हिंदू-मुस्लीम म्हणून नाही. तर आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जो या देशासाठी मरायला तयार आहे, जो या देशाला आपली मातृभूमी मानतो, तो जाती-पाती, धर्माने कोणी असला तरी आमचा आहे. ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये, म्हणून तुम्हाला काल रात्री मुहूर्त मिळाला. हिंदू-मुसलमानांना नुसते लढवायचे. म्हणजे, हिंदूंना पेटवायचे, मार मुसलमांवर दगड, मुसलमानांना पेटवायचे, मार हिंदूंवर दगड आणि त्या दोन्ही दगडांवर पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची. मरतात कोण? गरीब हिंदू आणि गरीब मुस्लीम," असेही ठाकरे म्हणाले.