हिंदूंनो, किमान दहा मुले जन्माला घाला- शंकराचार्य
By Admin | Published: December 25, 2016 10:37 PM2016-12-25T22:37:35+5:302016-12-25T22:37:35+5:30
आज हिंदुत्व धोक्यात आले आहे. हिंदू समाजापुढची आव्हाने निरंतर वाढत आहेत.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - आज हिंदुत्व धोक्यात आले आहे. हिंदू समाजापुढची आव्हाने निरंतर वाढत आहेत. अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्याचे कारण हिंदू संघटित नाहीत. त्यांची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर ‘हम दो, हमारे दो’ हे सरकारी आवाहन नजरेआड करीत ‘हम दो, हमारे दस’ हे धोरण राबवा. एका हिंदू दाम्पत्याने किमान दहा अपत्य जन्माला घालणे आवश्यक आहे. त्यांचे पोेट कसे भरायचे याची चिंता करू नका, त्यासाठी परमेश्वर समर्थ आहे, असे जाहीर आवाहन ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी धर्मसंस्कृती महाकुंभाच्या धर्मपीठावरून केले.
विश्व मांगल्याच्या विचारासह शहरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित तीन दिवसीय धर्मसंस्कृती महाकुंभाच्या रविवारी झालेल्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया, विद्यारण्य भारती, नरेंद्रनाथ महाराज, आचार्य जितेंद्रनाथ महाराज, साई चांडूरामसाहेबजी महाराज, साई युधिष्टिरलालजी महाराज, साई संतोष महाराज, जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य रामराजेश्वर माऊली महाराज, बाबुसिंग महाराज, जनार्दन स्वामी महाराज, दादामहाराज घोलप, संतोषनाथ ढोली महाराज, महामंडलेश्वर श्रीकृष्णभारती स्वामी महाराज, कृष्णदास नामदास महाराज,शिर्डी साई संस्थांनचे अध्यक्ष हावरे यांच्यासह हजारो संत उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व संतांचे धर्मसंस्कृती महाकुंभ समितीचे निमंत्रक जितेंद्रनाथ महाराज यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. या महाकुंभाच्या समारोपाप्रसंगी १११८ संतांच्या उपस्थितीतीत देशरक्षा, संस्कृतीरक्षेचा संकल्प करण्यात आला.