हिंदुत्वावरून युती तोडली : उद्धव
By admin | Published: October 3, 2014 12:32 AM2014-10-03T00:32:31+5:302014-10-03T00:33:22+5:30
कोल्हापुरातील प्रचारसभेत भाजपवर हल्लाबोल
कोल्हापूर : केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता यावी हे आमचे स्वप्न होते. स्वप्न सत्यात उतरले, पण त्यानंतर एक कटूसत्यही समोर आले. भाजपला हिंदुत्वाचा मुद्दा जड व्हायला लागला होता, म्हणूनच त्यांनी पंचवीस वर्षांची शिवसेनेबरोबरची युती तोडली, असा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील पेटाळा मैदानावर झालेल्या प्रचारसभेत केला. महाराष्ट्राचे तुकडे पाडू पाहणाऱ्यांचा या निवडणुकीत साफ पराभव करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात ठाकरे यांनी भाजपसह कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कारभाराचा तसेच वर्तनाचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही, पण भारतीय जनता पक्षाला हा मुद्दा जड व्हायला लागला होता. त्यामुळे जागांचे कारण ताणून धरत त्यांनी युती तोडली. भाजपने ३४ जागा मागितल्या होत्या. आम्ही त्यांना १८ जागा द्यायला तयार होतो. तरीही त्यांनी हट्ट सोडला नाही. मला माझी संघटना कापून आणि महाराष्ट्राची वाटणी करून जागा वाटप नको होते, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राने त्यांना केंद्रात साथ दिली, पण आता
त्यांनी लाथ मारली आहे. त्यामुळे शिवसेनेला एक लढाई लढावी लागत आहे. कोणतीही लढाई ही संख्येवर लढली जात नाही, तर ती निष्ठेवर जिंकली जाते. आमचे सैनिक हे निष्ठावंत आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर आम्ही ही लढाई जिंकू, असा मला विश्वास आहे. शिवसेनेला एकाकी पाडले असे कोणी म्हणत असेल तर मग सभेला ही गर्दी कशी होते असा सवाल करीत ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्यावरील भाजपच्या बेगडी प्रेमावरही टीका केली. आज यांना गांधीजींची आठवण झाली. दरवर्षी बापूजींना कोण हार घालत होता आणि आता कोण घालत आहे, हे आज गांधी जयंतीदिनी आपण पाहिले. गांधीजींना अपेक्षित असलेले कार्यकर्ते सत्तेत बसले आहेत का, हे तपासायची वेळ आली आहे.
कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही ठाकरे यांनी हल्लाबोल केला. या नेत्यांनी महाराष्ट्र उलट्या दिशेने नेला आहे. पंधरा वर्षे सत्तेत बसल्यामुळे दोन्ही कॉँग्रेसच्या संस्थानिकांना सत्तेचा माज आला आहे. त्यांचा माज या निवडणुकीत उतरवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, विजय देवणे, मुरलीधर जाधव, मारुतीराव जाधव गुरुजी, राजेखान जमादार, संप्रदा ठिकपुर्र्ले यांची भाषणे झाली. व्यासपीठावर संपर्क नेते दिवाकर रावते, आमदार राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक, संजय घाटगे, नरसिंग गुरुनाथ पाटील, प्रकाश आबिटकर, आदी उपस्थित होते.
जोडवी देणारे तुम्ही कोण?
कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीत दोन बोके आहेत. एकजण मटण, तर दुसरा
दारू वाटतोय. एकजण साडी, तर दुसरा जोडवी वाटत आहेत. अहो, पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे; कारण लग्नाआधी भाऊ जोडवी देतो, लग्नानंतर तिचा नवरा देतो. त्यामुळे तुम्हाला जोडवी वाटायचा अधिकार कोणी दिला? अशी विचारणा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली. ‘दक्षिण’मध्ये मटण, दारू, जोडवी व पैसे यांतील काहीच चालणार नाही. इथे फक्त बाणच चालेल, असे त्यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरातील पहिलीच सभा असल्याने तुडुंब गर्दी झाली होती. ही गर्दी पाहून ठाकरे यांनी ‘कोण म्हणतंय शिवसेना एकाकी आहे? त्यांनी इथे येऊन पाहावे’ असे म्हणताच शिवसैनिकांतून ‘जय भवानी... जय शिवाजी’चा जयघोष करून दाद दिली.
जेवढे आयुष्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीसाठी खर्च केले, त्यातील दहा टक्के शिवसेनेसाठी खर्च केले असते तर ते सार्थकी लागले असते, अशी सल शिरोळचे शिवसेना उमेदवार उल्हास पाटील यांनी बोलून दाखविली. तीन वेळा पराभूत झाल्यावर थेंबही अश्रू आला नाही. उमेदवारी नाकारल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील पाणी पाहून आपला बांध फुटल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना व्हिजन डॉक्युमेंट
शिवसेना सत्तेत आल्यावर कोल्हापूरला कृषी केंद्र उभारणार.
आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टॅब’ देणार
प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई, पुण्याला जोडणार
टोलमुक्त महाराष्ट्र करण्याबरोबर एलबीटी रद्द करणार.
शेट्टींनी ऐकले नाही
युती तुटल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांना भाजपबरोबर जाऊ नका असे सांगून २५ वर्षे त्यांच्यासोबत राहून आम्हाला जर हा अनुभव येत असेल तर तुमचे काय होईल, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही. उलट काही महिन्यांपूर्वी हेच संघटनेचे लोक आपल्याकडे कांद्याच्या भावासंदर्भात सरकारविरोधी भूमिका मांडण्यासाठी आले होते. त्यावेळी आपलं सरकार आहे. त्यामुळे मंत्र्यांचे पुतळे जाळू नका, असे सांगितले होते. यावेळी सरकारची आपण पाठराखण केली. नंतर मात्र पाठराखण केलेले पाठीमागे राहिले आणि नको ते हातात हात घालून एकत्र आले, अशा शब्दांत शेट्टी यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली.