BJP on Hindutva: "हिंदुत्व हा केवळ भाजपाचा नाही, संपूर्ण भारत देशाचा आत्मा आहे"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 07:24 PM2022-12-19T19:24:50+5:302022-12-19T19:25:16+5:30
भाजपाचे विरोधक, टीकाकारांना ठणकावून सांगितलं
BJP on Hindutva: हिंदुत्व आणि भाजपा-शिवसेना हा वाद गेल्या काही महिन्यांपासून खूपच उफाळून आल्याचे दिसत आहे. वीर सावरकरांवर जेव्हा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत टीका केली तेव्हा त्यावर शिवसेनेचा ठाकरे गट गप्प का, त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला का? असा सवाल भाजपाकडून वारंवार विचारण्यात आला. त्यानंतर, शिवसेना सुरूवातीपासूनच हिंदुत्वाचा पुरस्कार कर आहे, उलट भाजपाचे नेतेमंडळी सोयीनुसार हिंदुत्वाचा मतपेट्यांसाठी वापर करतात असा पलटवार ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. तशातच, हिंदुत्व केवळ भाजपाचाच नव्हे तर देशाचा आत्मा आहे असे भाजपाने विरोधकांना सडेतोड उत्तर देत ठणकावले.
"महाविकास आघाडीला लोक महावसुली आघाडी म्हणत असत. पण आता राज्यात विकासाचे डबल इंजिन असलेले सरकार आले आहे. विकासाचे राजकारण सुरू झाले आहे. पण भाजपाने आत्मसंतुष्ट होण्याचे कारण नाही. आपला संघर्ष अजूनही चालू आहे. भाजपाचे हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास हे धोरण आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यावेळी महाराष्ट्राने योगदान दिले आहे. कारण हिंदुत्व हा केवळ भाजपाचा नाही तर देशाचा आत्मा आहे," अशा शब्दांत राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी विरोधकांवर तोफ डागली.
"सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेला वारंवार सांगत राहिले पाहिजे. यासाठी संघटनात्मक जाळे बळकट करायचे आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीत महासंग्राम आहे. त्यासाठी पक्षाने संघटना सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात योजना निश्चित करून काम करण्याची गरज आहे," असेही ते म्हणाले.
"राज्यातील विविध जिल्ह्यांचा प्रवास करताना आपल्याला आढळले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेमध्ये पक्षासाठीचा पाठिंबा वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. पण आगामी निवडणुकीत आपली ५१ टक्क्यांची लढाई आहे. आपल्याला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवायची आहेत व त्यासाठी भाजपाची संघटना मजबूत करायची आहे. आगामी निवडणुकीत जेथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील तेथेही भाजपाच्या संघटनेचा पाठिंबा त्यांना उपयोगी पडेल. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आक्रमक रितीने कृतीशील भूमिकेत जावे लागेल. अभी नही तो कभी नही या जिद्दीने काम करावे लागेल," असा मोलाचा सल्ला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.