Hinganghat Burn Case : 'त्या' नराधमाला कडक शिक्षा होईल : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 01:50 PM2020-02-10T13:50:39+5:302020-02-10T13:59:27+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी देखील त्या तरुणीला पेटवून देणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली.
या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी देखील त्या तरुणीला पेटवून देणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला. जयंत पाटील म्हणाले की, हिंगणघाटमधील पीडित युवतीची मृत्यूशी झुंज अखेर संपली. ज्या नराधमाने हिंगणघाटमधील युवतीवर ही वेळ आणली त्याला कडक शासन होईल. या क्रूर मानसिकतेला अद्दल घडवण्याची गरज आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमावर सरकारकडून त्वरित आणि कठोर कारवाई होईल याची मला खात्री आहे.
हिंगणघाटमधील पीडित युवतीची आज मृत्यूशी झुंज अखेर संपली. ज्या नराधमाने हिंगणघाटमधील युवतीवर ही वेळ आणली त्याला कडक शासन होईल. या क्रूर मानसिकतेला अद्दल घडवण्याची गरज आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमावर सरकारकडून त्वरित आणि कठोर कारवाई होईल याची मला खात्री आहे. pic.twitter.com/pdjqVXlW8z
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 10, 2020
गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.