हिंगणघाटमध्ये कडकडीत बंद; विराट मोर्चातून नागरिकांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:53 AM2020-02-05T03:53:56+5:302020-02-05T03:56:22+5:30

महिला, विद्यार्थिनींसह शिक्षकही उतरले रस्त्यांवर

Hinganghat city was tightly closed on Tuesday | हिंगणघाटमध्ये कडकडीत बंद; विराट मोर्चातून नागरिकांनी व्यक्त केला संताप

हिंगणघाटमध्ये कडकडीत बंद; विराट मोर्चातून नागरिकांनी व्यक्त केला संताप

googlenewsNext

हिंगणघाट (वर्धा) : प्राध्यापिकेवर माथेफिरू युवक विक्की उर्फ विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे संतप्त पडसाद मंगळवारी सर्व राज्यात उमटले. घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी हिंगणघाट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. पोलिसांनी हिंगणघाट येथील तालुका न्यायालयात नगराळे याला हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

सर्वपक्षीयांसह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मंगळवारी हिंगणघाट बंदची हाक देण्यात आली होती. स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली. नंदोरी चौकापासून निघालेल्या मोर्चात ५० हजारांवर महिलांसह नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांनी घटनेचा तीव्र निषेध केला. आरोपीला जामीन मिळू देऊ नका तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मोर्चात महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला यांच्यासह विविध राजकीय पक्ष, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. नंदोरी चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चाचा समारोप हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या आवारात झाला. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात आमदार समीर कुणावार, माजी आमदार अशोक शिंदे, प्रा. राजू तिमांडे, अ‍ॅड. सुधीर कोठारी, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले आदींसह महिला पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते.

आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय

बार असोसिएशनने घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी याबाबतचे एक निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केले. आरोपीचे वकीलपत्र कुणीही या घटनेतील घेऊ नये, असे आवाहन हिंगणघाट तालुका बार असोसिएशनने केले आहे.

घटनेने हादरले गाव

आरोपी विकेश व प्राध्यापक युवती हे दोघेही दारोडा गावाचे रहिवासी आहेत. राष्ट्रीय महामार्गावर हैदराबाद रोडवर हिंगणघाटपासून १५ किमी अंतरावर दोन हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. एखाद्या चांगल्या कामासाठी गावाचे नाव झाले असते तर आम्हाला निश्चितच आवडले असते, अशा ग्रामस्थांच्या भावना आहेत. घटनेने गाव हादरले. सोमवारी रात्री गावकºयांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविला.

Web Title: Hinganghat city was tightly closed on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.