हिंगोलीत साकारतेय वनौषधी उद्यान
By admin | Published: November 9, 2016 05:05 AM2016-11-09T05:05:44+5:302016-11-09T05:05:44+5:30
वनविभागाच्या वतीने वनपर्यटनाच्या विकास कार्यक्रमांतर्गत येथील २२० हेक्टर नैसर्गिक डोंगराचा विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे
औंढा नागनाथ (हिंगोली) : वनविभागाच्या वतीने वनपर्यटनाच्या विकास कार्यक्रमांतर्गत येथील २२० हेक्टर नैसर्गिक डोंगराचा विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात वनौषधी उद्यानाची निर्मिती केली जात असून, यामध्ये आतापर्यंत १४४ जंगली वनस्पतींची लागवड केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एस. खुपसे यांनी दिलीे.
२०११-१२ पासून येथे कामे सुरू असून आतापर्यंत रोपवनामध्ये ९५ हेक्टरवर विविध झाडे लावण्यात आली आहेत. उर्वरित २५ हेक्टर जंगलावर नक्षत्र उद्यान, बाल उद्यान, लॉन, पॅगोडा, पार्र्किं ग, प्रवेशद्वार, निसर्ग निर्वाचन केंद्रे, १२० हेक्टरमध्ये ६ ठिकाणी नैसर्गिक ‘व्हीव पॉइंट’ माती बांध व वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती, असे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
सध्या याच क्षेत्रामध्ये वनऔषधी उद्यान उभारण्याचे काम वर्षभरापासून सुरू असून, २० गुंठ्यामध्ये नागकेश्वर, कैलाशपती, अंजीर, सप्तपर्णी, कागदीलिंबू, सर्पगंधा, समुद्रशोक, मधुमालती, आडूळसा, गवती, शतावरी, ब्राम्ही, इन्सुलीन, स्टिव्हीया, जायफळ, आनंतमूळ, केवडा, कापूर तुळसी, जिरॅनीयम, सफेद मुसळी, काळा धोत्रा, पिवळा धोत्रा, पितमारी, पाणफुटी, एरंड, अर्जून, बेल, आवळा, आंबा, वड, उंबर, सीता अशोक, जांभूळ अशी विविध गुणकारी १४४ वनौषधींची झाडे लावण्यात आली आहेत. (वार्ताहर)