मंत्रिपद दिलं तर माझ्यात पुन्हा दहा हत्तीचं बळ येईल - संतोष बांगर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 07:09 PM2022-07-11T19:09:58+5:302022-07-11T19:11:43+5:30
Santosh Bangar : बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही मागून घेणारा नाही. बाळासाहेबांचे आशीर्वादच असे होते की शब्द टाकला की पूर्ण होत होता, असे संतोष बांगर यांनी सांगितले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिंदे गटातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का दिला आहे. संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष बांगर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, संतोष बांगर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही आक्रमक आहात, कार्यकर्त्यांकडून मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. तुम्हाला काय वाटते, मंत्री मिळेल का? असे विचारले. यावर "मंत्रिपद कोणाला नको. मंत्रिपद देत असतील तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा शिवसैनिक वाढवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे," असे संतोष बांगर म्हणाले.
याचबरोबर, मी मंत्रिपदाच्या अपेक्षेने कुठलंही काम करत नाही. माझ्या नेत्यांना माझ्यावर विश्वास असेल तर मुख्यमंत्री जे आदेश देतील, त्या आदेशाचे मी पालन करणारा कडवट शिवसैनिक आहे. साहेबांच्या मनात असेल तर माझ्यावर जबाबदारी टाकतील. मी स्वतः मंत्रिपद मागणार नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही मागून घेणारा नाही. बाळासाहेबांचे आशीर्वादच असे होते की शब्द टाकला की पूर्ण होत होता, असे संतोष बांगर यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेसाहेब तसेच बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांना वाटलं जबाबदारी द्यायची तर ते देतील. नाही दिली तरी मी सदैव शिवसेनेचा आमदार म्हणून कामासाठी तत्पर राहीन. मला मंत्रिपद मिळावे अशी अनेक कार्यर्त्यांच्या भावना आहे. तसे ते बोलून देखील दाखवतात. पण मुख्यमंत्री जे ठरवतील ते मान्य असेल, असे संतोष बांगर म्हणाले.
याशिवाय, मंत्रिपद कोणाला नको. मंत्रिपद देत असत तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा शिवसैनिक वाढवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. शिवसेनेचा मंत्री कसा असावा, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कसा असावा, आमदार कसा असावा, हे मी सांगत तर आजूबाजूच्या परिसरातील लोकही सांगतात, असे संतोष बांगर यांनी म्हटले आहे.
संतोष बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवलं
संतोष बांगर हे पक्षातून बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्हा भरात शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हा प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. शिवसेनेकडून हा मोठा धक्का संतोष बांगर यांना दिला गेला आहे. २००९ पासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. संतोष बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर आता नवीन जिल्हा प्रमुख निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचपणी करीत आहे.