हिंगोली : सेनगावात गर्भपाताचा लाखोंचा औषधीसाठा जप्त
By Admin | Published: April 6, 2017 08:32 PM2017-04-06T20:32:29+5:302017-04-06T20:32:29+5:30
येथील जय गजानन मेडिकलवर औरंगाबाद येथील अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाच्या सहायक आयुक्तांच्या पथकाने छापा मारून जवळपास दोन लाखांचा गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला.
ऑनलाइन लोकमत
सेनगाव (जि.हिंगोली), दि. 6 : येथील जय गजानन मेडिकलवर औरंगाबाद येथील अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाच्या सहायक आयुक्तांच्या पथकाने छापा मारून जवळपास दोन लाखांचा गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला. तर प्रतिबंधित औषधांचा आठ लाखांचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
सेनगाव येथील जय गजानन मेडिकलवर प्रतिबंधित औषधींची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याकडे तक्रार गेली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक आयुक्त अमृत निखाडे यांच्या पथकाने गोपनिय पद्धतीने हा छापा मारला. या पथकात परभणी, औरंगाबाद, नांदेड, जालन्याचे ८ अधिकारी आहेत. त्यात मेडिकल दुकानासह दुकान मालक महेश जेथलिया यांच्या घराचीही पथकाने झाडाझडती घेतली. त्यात दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या गर्भपाताच्या किट त्याच्याकडे असल्याचे आढळले. तर त्यापैकी ९३ किट त्याने विक्री केल्या होत्या. याशिवाय शासनाने प्रतिबंधित केलेली सहा ते साडेसहा लाख रुपये किमतीची इतरही औषधी आढळून आली. दुपारी दोन वाजेपासून हे पथक घर व मेडिकल दोन्ही ठिकाणी तळ ठोकून होते. राहत्या घरीच अवैध औषधींचा साठा सापडला. यात प्रतिबंधित झोपेच्या गोळ्या, सेक्ससंबंधित शक्तीवर्धक गोळ्या, कोरेक्स औषधींच्या बाटल्या असा आठ लाखांच्या मालाचा समावेश आहे.
एकूण ५00 किट इंदोर येथून नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्या होत्या. त्यापैकी ४0७ जप्त केल्या. तर ९३ विकल्याचे आढळून आले.या ९३ किटबाबत सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल होत आहे. त्या कोणाला विकल्या, त्याचा कसा उपयोग झाला, याची माहिती मिळण्यासाठी ही प्रक्रिया होत आहे.
तर जप्त करण्यात आलेल्या मालाबाबत अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागच तपासणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्यातील मोठी कारवाई
परळी येथील गर्भपात रॅकेट उद्ध्वस्त झाल्यानंतर जेवढा साठा सापडला नव्हता, त्यापेक्षाही जास्त हा साठा आहे. तर मराठवाड्यातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सेनगावातील सर्व मेडिकल दुकाने बंद होती.
नवे रॅकेट तर नाही?
सेनगावसारख्या अविकसित भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्भपातासह प्रतिबंधित औषधांचा साठा सापडल्याने यामागे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पोलिस तपासासह अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधकच्या चौकशीतच ही बाब समोर येणार आहे.