हिरानंदानी रुग्णालयाचा वादग्रस्त करार रद्द
By admin | Published: January 20, 2017 04:47 AM2017-01-20T04:47:10+5:302017-01-20T04:47:10+5:30
वाशीतील हिरानंदानी फोर्टीज सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा करार पालिकेने रद्द केला
नामदेव मोरे,
नवी मुंबई- वाशीतील हिरानंदानी फोर्टीज सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा करार पालिकेने रद्द केला आहे. मोफत उपचारांसाठी पालिकेने अल्पदरात हिरानंदानीला इमारत दिली. पण १० वर्षांमध्ये सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळालेच नाहीत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या फसलेल्या निर्णयांमध्ये हिरानंदानी सुपरस्पेशालिटीबरोबर केलेल्या कराराचा समावेश आहे. शहरातील गरीब रुग्णांवर मोफत सुपरस्पेशालिटी उपचार करता यावेत यासाठी २००६मध्ये हिरानंदानीला अल्प दराने वाशी रुग्णालयाची २० हजार चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली. या परिसरातील बाजारभाव ६० ते १०० रुपये प्रतिचौरस फूट असताना पालिकेने फक्त ३ रुपये ७५ पैसे दराने संबंधितांना जागा उपलब्ध करून दिली. पण काही दिवसांमध्ये हिरानंदानीने त्यांचे सर्व शेअर फोर्टीजला विकले व तेथे २००८मध्येच फोर्टीज रुग्णालय सुरू झाले. येथे १५ बेड पालिकेने सांगितल्याप्रमाणे रुग्णांसाठी राखीव ठेवले होते; पण धोरण निश्चित झाले नसल्याने तीन वर्षे एकही रुग्ण पाठविला नाही.
वाशीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर व न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पालिकेने करार रद्द केला आहे.
>फोर्टीजची भूमिका काय?
हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयाचा करार रद्द केल्यानंतर याविषयी व्यवस्थापनाची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; पण उशिरापर्यंत व्यवस्थापनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. याविषयी लवकरच भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे समजले.