‘त्याचे’ पाकिस्तानला येणे-जाणे होते
By admin | Published: May 23, 2017 03:43 AM2017-05-23T03:43:38+5:302017-05-23T03:43:38+5:30
कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत काहीसा सुटकेचा नि:श्वास भारताने टाकला. मात्र शेख नबी अहमद नामक भारतीयाला पाकिस्तानने अटक केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी प्रसारित केले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत काहीसा सुटकेचा नि:श्वास भारताने टाकला. मात्र शेख नबी अहमद नामक भारतीयाला पाकिस्तानने अटक केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी प्रसारित केले आणि शेखच्या नातेवाइकांचा शोध दिवसभर प्रसारमाध्यमांनी घेतला. मात्र त्याच्या नातेवाइकांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
शेख हा काही वर्षांपूर्वी जोगेश्वरी पूर्व परिसरात राहत होता. पाच वर्षांपूर्वी तो येथून बेपत्ता झाला. त्याचे नातेवाईक अंबोलीतील दिवाण सेंटरजवळ मीना हॉटेलच्या शेजारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला. मात्र त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
कुलभूषण जाधव यांचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही वाच्यता आम्हाला करायची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखदेखील याच्या कुटुंबासह अंबोलीत राहत होता. त्याचे पाकिस्तानला येणे-जाणे होते. मात्र कोणत्या कारणासाठी तो ये-जा करायचा हे समजू शकले नाही. त्याला पाकिस्तानात पकडले गेले तेव्हा मी भारतीय आहे, असे त्याने सांगितले. त्याच्याकडे पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. १९ मे रोजी त्याला अटक झाल्याचे वृत्त पाक प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र पाक सरकारने त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.