वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:05 PM2024-07-08T18:05:38+5:302024-07-08T18:06:41+5:30
Vijay Wadettiwar : लंडनहून येणारी वाघनखे ही छत्रपती शिवरायांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही लवकरच लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करणार आहे. परंतु, लंडनहून येणारी वाघनखे ही छत्रपती शिवरायांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडूनही पुष्टी करण्यात आल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने जे पत्र पाठवले आहे, त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. ती वाघनखं ओरिजनल आहेत का? या संदर्भात आम्ही माहिती देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. गाजावाजा करून वाघनखांच्यासंदर्भात जी भूमिका मांडली, त्याला या पत्रामुळे धक्का बसला आहे. तसेच, या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या सरकारने दिखाऊपणा केलेला आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चाललेल्या लोकांच्या भावनेशी सरकार खेळत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
इंद्रजीत सावंत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची वाघनखं घेऊन येणार, असा दावा राज्य सरकारतर्फे केला जात आहे. मात्र ते संग्रहालय स्वतः सांगत आहे की, ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अधिकारी करारासाठी गेले होते, तेव्हाही त्यांनाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ही वाघनखं शिवरायांची नाहीत. तसेच, संग्रहालयाच्या संचालकांनी याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितली आहे. तुम्ही ही वाघनखे भारतात घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात वाघनखे ठेवणार आहे, तिथे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. याविषयी साशंकता असल्याचे स्पष्ट करावे, असे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पत्रात लिहिले असल्याचे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.