ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 09:04 PM2024-10-03T21:04:33+5:302024-10-03T21:04:43+5:30

केंद्र सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Historic day! Marathi language gets status of classical language; Big decision of Central Govt | ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Marathi Classical Language Status : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. आज अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच भारतीय भाषांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याकडे आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता. आता आज मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे."

आज ऐतिहासिक दिवस-देवेंद्र फडणवीस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो."

"हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

केंद्र सरकारच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. "माझा मराठाची बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!" अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.

Web Title: Historic day! Marathi language gets status of classical language; Big decision of Central Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.