भारतासाठी ऐतिहासिक क्षण! आता जमिनीखालील गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 06:04 AM2022-12-04T06:04:02+5:302022-12-04T06:04:57+5:30

जीएसआय, नागपूरच्या भूवैज्ञानिकांनी दाखविली दिशा

Historic moment for India! Now electricity will be generated from underground hot water | भारतासाठी ऐतिहासिक क्षण! आता जमिनीखालील गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती

भारतासाठी ऐतिहासिक क्षण! आता जमिनीखालील गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती

googlenewsNext

निशांत वानखेडे

नागपूर : साैरऊर्जा, पवनऊर्जा, जलऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आता भू-औष्णिक (जीओथर्मल) उर्जेची भर पडणार आहे. भूगर्भातील उष्ण पाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रयाेग यशस्वी ठरला असून, वैज्ञानिकांना दिल्ली येथे ५ किलाेवॉट वीज तयार करण्यात यश आले आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे जगातील भू-औष्णिक ऊर्जा तयार करणाऱ्या देशात आता भारताचेही नाव नाेंदविले जाणार आहे. 

कुठे झाला प्रयोग?
दिल्ली येथे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेत डाॅ. मनमाेहन कुमार व डाॅ. भूपेश शर्मा यांच्या नेतृत्वात पायलट प्राेजेक्ट राबविण्यात आला. संस्थेचे वैज्ञानिक भूपेश शर्मा यांनी ‘लाेकमत’ला या प्रकल्पाची माहिती दिली. 

कशी झाली सुरुवात?
जीएसआय आणि ओएनजीसीच्या संशाेधकांनी देशात भूगर्भातून उष्ण पाण्याचे झरे निघणारी १०० पेक्षा अधिक ठिकाणे शाेधली आहेत. त्या उष्ण पाण्याच्या नैसर्गिक स्रोताद्वारे वीजनिर्मिती हाेऊ शकते, ही दिशा भारतीय भू-सर्वेक्षण (जीएसआय) नागपूरचे संचालक व भूवैज्ञानिक डाॅ. विशाल साखरे व त्यांच्या टीमने दाखविली. काेळसा मंत्रालयाने या पायलट प्राेजेक्टसाठी १.७ काेटी रुपये मंजूर केले. अडीच हजार चाैरस फूट जागेत वैज्ञानिकांनी तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांतून ५ किलाेवॉट वीजनिर्मितीचा प्रयाेग यशस्वी केला. यावेळी भू-औष्णिक उर्जेपासून दाेन बल्ब पेटवून हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.

यात पाच देशांची मक्तेदारी
अमेरिका, आयर्लंड, फिलिपिन्स, इंडाेनेशिया व मेक्सिकाे. 
आयर्लंडमध्ये ९० टक्के गरज भू-औष्णिक उर्जेने भागविली जाते. 
५ हजार मे.वॅ. वीजनिर्मिती करून मुंबई, दिल्लीची वर्षभराची गरज पूर्ण होऊ शकते.

हा पहिला प्रयाेग यशस्वी ठरला आहे. लवकरच तेलंगणाच्या मनुगुरू येथे २० किलाेवॉट विजेची निर्मिती करून व्यापक स्तरावर पाऊल टाकले जाणार आहे. यामुळे भू-औष्णिक ऊर्जा क्षेत्रात जगाच्या नकाशात भारताचे नाव नाेंदविले जाणार आहे.  - डाॅ. विशाल साखरे, संचालक, (भू-औष्णिक विभाग), जीएसआय, नागपूर

अशी झाली वीजनिर्मिती
पाण्याचा उष्णांक बिंदू (बाॅइलिंग पाॅइंट) १०० डिग्री असताे. मात्र, वैज्ञानिकांनी ६५ ते ७० डिग्री उष्ण पाण्यातून वीजनिर्मिती केली. या उष्ण झऱ्यातून उष्णता (हीट) बाहेर काढण्यात आली. टर्बाईनमध्ये या उष्णतेसाेबत एक विशिष्ट लिक्विडमिश्रित करून त्याद्वारे वाफ तयार करण्यात आली. ही वाफ पुन्हा लिक्विडमध्ये परिवर्तीत करण्यात आली. हे चक्र सतत सुरू ठेवत वीजनिर्मिती करण्यात आली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Historic moment for India! Now electricity will be generated from underground hot water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज