ऐतिहासिक वास्तूंवर कुदळ
By admin | Published: February 1, 2016 02:59 AM2016-02-01T02:59:42+5:302016-02-01T02:59:42+5:30
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ तीव्र करीत जनजागृतीवर भर दिला, तरी गुप्तधनाच्या लालसेने अनेक जण सद्सद्विवेक बुद्धीला तिलांजली देतात
विवेक चांदूरकर , अकोला
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ तीव्र करीत जनजागृतीवर भर दिला, तरी गुप्तधनाच्या लालसेने अनेक जण सद्सद्विवेक बुद्धीला तिलांजली देतात. याच मोहातून ऐतिहासिक, प्राचीन वारसा लाभलेल्या वास्तूंवर कुदळ चालवायलादेखील ते मागेपुढे पाहात नाहीत. मेहकर येथील कंचनीचा महाल, तसेच लोणार येथील काही मंदिरांमध्ये ठिकठिकाणी खोदलेले खड्डे याचीच प्रचिती देतात.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे ‘कंचनीचा महाल’ म्हणून एक वास्तू प्रसिद्ध आहे. एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी कंचनी एक नर्तिका होती. तिचे नृत्य बघायला येणारे राजे-महाराजे तिला मौल्यवान दागिने भेट द्यायचे. ते दागिने या महालामध्ये दडविण्यात आले असल्याची अफवा आहे. दागिन्यांच्या हव्यासापोटी काहींनी महालात ठिकठिकाणी खड्डे खणले आहेत. त्याच्या मधोमध तर मोठा खड्डा आहे. ही वास्तू बघायला पर्यटक येतात. मात्र, खड्ड्यांमुळे त्यांना व्यवस्थित फिरता येत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार हे उल्कापातातून तयार झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी जगप्रसिद्ध असून, सरोवराच्या परिसरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. या मंदिरांच्या आजुबाजूला देखील गुप्तधनप्राप्तीसाठी ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
राज्यातील किल्ले, राजवाडे या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्याची जबाबदारी पुरातत्त्व खात्याची आहे. या खात्याच्या वतीने प्रत्येक ऐतिहासिक वास्तूजवळ एक कायमस्वरूपी चौकीदार ठेवण्याची गरज आहे. काही ठिकाणी चौकीदार नेमले असले, तरी ते या ठिकाणी हजर नसतात. त्याचा फायदा हे गुप्तधन शोधणारे घेतात व ऐतिहासिक वास्तूंची नासधूस करतात.