पुणे मेट्रोच्या मार्गात ऐतिहासिक वास्तू
By admin | Published: July 12, 2016 03:46 AM2016-07-12T03:46:42+5:302016-07-12T03:46:42+5:30
मुंबई मेट्रोपाठोपाठ आता पुणे मेट्रोच्या मार्गातही अडथळे निर्माण झाले आहेत. शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर आणि आगाखान पॅलेस या ऐतिहासिक
दीप्ती देशमुख, मुंबई
मुंबई मेट्रोपाठोपाठ आता पुणे मेट्रोच्या मार्गातही अडथळे निर्माण झाले आहेत. शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर आणि आगाखान पॅलेस या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातून पुणे मेट्रोचा मार्ग जात असल्याने राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय या प्रकल्पाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकार, पुणे महापालिका दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोशन, राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाला येत्या दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे मेट्रो ३१.५ कि. मी धावणार आहे. या मेट्रोचा मार्ग क्रमांक १ पाताळेश्वर मंदिर व शनिवार वाडा व मार्ग क्रमांक २ पाताळेश्वर मंदिर ते आगाखान पॅलेस या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातून जाणार आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या १०० मीटर परिसरात विकास करण्यास कायद्याने प्रतिबंध असतानाही याच क्षेत्रातून पुणे मेट्रोचे दोन मार्ग काढण्यात येणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने पुण्याच्या ‘परिसर संरक्षण संवर्धन संस्थे’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेनुसार, पुणे महापालिकेने मेट्रोसाठी सल्लागार म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोेशनची (डीएमआरसी) नियुक्ती केली. डीएमआरसीने मेट्रोचे दोन मार्ग पाताळेश्वर मंदिर, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस या तीन ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातून सुचवले आहेत. पुणे महापालिकेने प्रस्तावित विकास आराखड्यात हे दोन्ही मार्ग दाखवले आहेत. सरकारनेही या मार्गांना मंजुरी दिली आहे. मात्र मंजुरी देण्यापूर्वी राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी मिळवलेली नाही. तसेच सर्वेक्षणही करण्यात आलेले नाही. उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह, पुणे महापालिका, राष्ट्रीय स्मारके प्राधिकरण, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसह अन्य प्रतिवाद्यांना दोन आठवड्यांत यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश
दिले. (प्रतिनिधी)