फक्त इयत्ता बदलली; शिवरायांचा इतिहास आता सहावीच्या अभ्यासक्रमात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 05:35 PM2019-10-17T17:35:28+5:302019-10-17T17:40:55+5:30
शिवरायांचा इतिहास हद्दपार केला नाही; महाराष्ट्र शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण
मुंबई: केंद्रीय शिक्षण मंडळातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डावलण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकार धरलं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा विषय चर्चेत आल्यानं त्यावरुन राजकारण पेटलं आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्र शिक्षण मंडळानं स्पष्टीकरण दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वेगळे पैलू इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात उलगडणार असल्याचं मंडळानं म्हटलं आहे.
याआधी शिवरायांचा इतिहास चौथीत शिकवला जात होता. यापुढे हा इतिहास सहावीत शिकवला जाईल, असं महाराष्ट्र शिक्षण मंडळानं स्पष्टीकरणात म्हटलं आहे. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंडळातून छत्रपतींचा इतिहास डावलला जात असल्याची टीका होत असतानाच राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं सरकारवर चौफेर टीका झाली आहे.
चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार
महाराष्ट्राची संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात झाली. या मंडळाने यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकाची छपाई केली आहे. त्यातून ही बाब समोर आली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर अनेक सरकार बदलली, मात्र पुस्तकातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता.
अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास परत घ्या अन्यथा... धनंजय मुंडेंचा इशारा
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा इतिहास वगळल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजपा-शिवसेनेचं सरकार हद्दपार करण्याची हीच ती वेळ आहे. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आता घालवुया सरकार हे एकच उद्दिष्ट ठेऊन काम कराव असं आवाहन काँग्रेसचे माजी खासदार अशोक चव्हाण यांनी केलं.
खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनीदेखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली.