धरण अन् वीजनिर्मितीचा इतिहास उलगडणार

By admin | Published: June 11, 2016 01:12 AM2016-06-11T01:12:11+5:302016-06-11T01:12:11+5:30

केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले

The history of dam and power generation will be unveiled | धरण अन् वीजनिर्मितीचा इतिहास उलगडणार

धरण अन् वीजनिर्मितीचा इतिहास उलगडणार

Next


पुणे : केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने खडकवासला येथील संशोधन संस्थेचे केंद्र नागरिक आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असून, विविध विषयांवरील चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. केंद्राचे संचालक डॉ. एम. के. सिन्हा यांनी ही माहिती दिली.
या उपक्रमामुळे या केंद्राच्या माध्यमातून देशभरातील धरणे, नव्याने बांधली जाणारी धरणे, वीजनिर्मिती, त्याबाबत केले जाणारे संशोधन यांचा इतिहास उलगडणार आहे. तसेच, केंद्राच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर हे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले.
संस्थेच्या माध्यमातून गेल्या शंभर वर्षांत तब्बल ५,३९७ संशोधन प्रकल्प राबविण्यात आले असून, त्यांचे तांत्रिक अहवाल सादर केले आहेत. त्याचा देशाच्या विकासात मोलाचा वाटा आहे. तसेच, या ठिकाणी संशोधणासाठी असलेल्या पायाभूत सुविधा या जागतिक दर्जाच्या आहेत. याशिवाय, केंद्राच्या वतीने नद्या जोड प्रकल्पासाठी विशेष प्राधान्य देण्यात येत असल्याचे सिन्हा म्हणाले.
>या शताब्दी वर्षाची सुरूवात येत्या १४ जूनपासून होणार असून, त्या दिवशी सर्वसामान्य नागरिक आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रातील २५ धरणांचे तसेच जलविद्युत निर्मितीचे प्रारूप प्रकल्प पाहता येतील. याशिवाय, १ जुलै रोजी पर्यावरण आणि पाणी या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र, सप्टेंबर महिन्यात मुख्य शताब्दी कार्यक्रम, आॅक्टोबर महिन्यात ‘धरण सुरक्षितता आणि पुनर्वसन’ या विषयावरील परिसंवाद, डिसेंबर २०१६मध्ये हायड्रो २०१६ ही जागतिक परिषद आणि फेब्रुवारी २०१७मध्ये ‘समुद्रकिनारे आणि बंदरे’, तसेच सागरी अभियांत्रिकी या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद घेण्यात येणार आहे.

Web Title: The history of dam and power generation will be unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.