दिव्यांग चित्रकार चेतनने रचला फ्रान्समध्ये इतिहास; एबीलिंपिक्स स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:28 AM2023-03-28T06:28:47+5:302023-03-28T06:29:20+5:30
चेतनने आपल्या कल्पकतेला व्यक्त करण्यासाठी हातात ब्रश घेतला आणि सृजनशील कलाकृती साकारल्या.
पाली : सुधागड तालुक्यातील तळई गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. रविवारी फ्रान्समध्ये झालेल्या दहाव्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली असून, ४० वर्षांत पहिल्यांदाच भारतालासुवर्ण पदक मिळाले आहे.
चेतनने आपल्या कल्पकतेला व्यक्त करण्यासाठी हातात ब्रश घेतला आणि सृजनशील कलाकृती साकारल्या. चेतनने आतापर्यंत १०५ हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. त्यामध्ये १० सुवर्ण पदके, २६ इतर पदके, ३० चषक आणि ११५ हून अधिक प्रमाणपत्रांचा समावेश आहे. २०१८ मध्ये राष्ट्रीय एबीलिंपिक्स या दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये चेतनला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. त्याने त्याची काही चित्रे एनएसजी कमांडोंना समर्पित केली आहेत.
चेतन पाशिलकरचा थक्क करणारा प्रवास
श्रवण दोषामुळे त्याचे शिक्षण शारीरिकदृष्ट्या आव्हान असलेल्या मुलांच्या शाळेमध्ये आहे. तेथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाने स्वतःचे भाव चित्रकलेतून व्यक्त करण्याचा त्याला मार्ग सापडला. त्यानंतर चित्रकला हे त्याच्या भावनेचे माध्यम बनले. जी.डी. आर्ट डिप्लोमा आणि बीएफए पेंटिंगचे पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून त्याने एम.एफ.ए. चित्रकला पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली.