साहित्यातून झळकणार काश्मीरचा इतिहास : सरहद, संजय सोनवणी यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 11:28 AM2019-03-26T11:28:59+5:302019-03-26T11:37:21+5:30

काश्मीरचा हा सांस्कृतिक, राजकीय इतिहास अद्याप विस्तृत स्वरुपात लिहिला गेलेला नाही.

History of Kashmir to be seen in Literature : Initiative sarhad and Sanjay Sonawani | साहित्यातून झळकणार काश्मीरचा इतिहास : सरहद, संजय सोनवणी यांचा पुढाकार

साहित्यातून झळकणार काश्मीरचा इतिहास : सरहद, संजय सोनवणी यांचा पुढाकार

Next
ठळक मुद्देचीन-भारतीय संबंधांत काश्मीरची मोलाची भूमिकाकाश्मीरचा पुरातत्व इतिहास, राजकीय इतिहास, सामाजिक इतिहासही लिहिला जाणार

- प्रज्ञा केळकर-सिंग- 
पुणे : सातव्या शतकापासून भारत आणि चीन संबंधांमध्ये काश्मीरने मोलाची भूमिका बजावली आहे. काश्मीरचा हा सांस्कृतिक, राजकीय इतिहास अद्याप विस्तृत स्वरुपात लिहिला गेलेला नाही. चीनमधील प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णने, चीनच्या तांग घराण्याच्या कागदपत्रांमधून मिळालेले दुवे, कोरियन साहित्यातील संदर्भ आदींच्या सहाय्याने पुस्तक मालिकेच्या रुपाने सरहद संस्थेतर्फे या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या माध्यमातून काश्मीरकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलेलच; शिवाय, भारत-चीन यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. लेखक संजय सोनवणी या प्रकल्पासाठी कार्यरत आहेत. भविष्यात या लेखनप्रपंचाच्या निमित्ताने चीनमधील अभ्यासक आणि भारतीय अभ्यासक यांच्यामध्ये चर्चा घडून आल्यास भारत-चीन संबंध सुधारण्यास मदत होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सातव्या शतकात, चीनपासून पश्चिमेला तुर्कस्तान, काबूल, उझबेकिस्तान एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात काश्मीरने सत्ताकेंद्राची भूमिका बजावली. चीनपासून मध्य आशियापर्यंत जाणारा व्यापारी मार्गावर काश्मीरमधील करकोटक घराण्याचे स्वामित्व मिळवले होते. चीन आणि तिबेटच्या युध्दानंतर काश्मीरच्या राजाने चीनची राजकन्या जिन चिंग हिला आश्रय दिला होता. पुढील काळात राजा ललितादित्याने काश्मीरचे वर्चस्व कायम राखले. इतिहासातील या नोंदी भारतामध्ये कोठेही आढळून येत नाहीत. तांग घराण्याच्या दरबारी नोंदींमध्ये ही माहिती मिळते, अशी माहिती संजय सोनवणी यांनी लोकमत शी बोलताना दिली.
ते म्हणाले, ललितादित्याच्या काळामध्ये तिबेटचे प्राबल्य वाढू लागले होते. त्यामुळे चीनला आणि भारतालाही त्रास होत होता. त्यावेळी ललितादित्याने तिबेटवर स्वारी करुन सर्व व्यापारी मार्ग मोकळे केले. काश्मीरने त्या काळापासूनच चीनशी सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक संबंध प्रस्थापित केले होते. असंख्य संस्कृत ग्रंथ चीनी आणि तिबेटी भाषेत अनुवादित झाले. सातव्या शतकात रत्नचिंता नावाचा पंडित स्वत: चीनमध्ये गेला आणि त्याने तेथे मठ स्थापन केला. चीनशी भारताचे संबंध प्रस्थापित करण्याचे काम काश्मीरने झाले.

चीन आणि भारतात सध्या तणावाचे संबंध आहेत. मात्र, तिस-या शतकापासून काश्मीरच्या माध्यमातून भारताचे चीनशी राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, लष्करी संबंध प्रस्थापित झाले. आपल्या इतिहासामध्ये दुदेर्वाने याबाबत कोणतेही संदर्भ आढळत नाहीत. तुर्कस्तान, अफगाणिस्तान अशा देशांमधील साहित्यात तुकड्या-तुकड्याने ही माहिती विखुरलेली आहे. ती पुस्तकरुपात संकलित करण्याचे काम यानिमित्ताने सुरु केले आहे.

संजय सोनवणी यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून इतिहासातील सर्व नोंदींचा बारकाईने अभ्यास केला असून, आता वाचकांसमोर माहितीचा हा खजिना पुस्तकरुपाने समोर येणार आहे. सध्याच्या पुस्तकामध्ये ललितादित्यवर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आले असून, काश्मीरचा पुरातत्व इतिहास, राजकीय इतिहास, सामाजिक इतिहासही लिहिला जाणार आहे. यातून आजच्या काश्मीरी जनतेला आपली पाळेमुळे कशी रुजली होती, ज्ञानक्षेत्रामध्ये काश्मीरने भारताचे ५०० वर्षे नेतृत्व केले, याबाबत जाणीव होईल. सध्या काश्मीरची ओळख केवळ दहशतवादापुरती मर्यादित राहिली आहे. काश्मीरचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व वाचकांसमोर आणणे महत्वाचे आहे. त्यातूनच काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकेल. 

---------------
सरहद संस्थेतर्फे काश्मीरच्या इतिहासातील सांस्कृतिक, राजकीय संदर्भ वाचकांसमोर आणण्याच्या दृष्टीने लेखनप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. चीन आणि भारतामध्ये सध्या तणावाचे संबंध असले तरी काश्मीरने त्याकाळी महत्वाची भूमिका बजावली आहे. हा इतिहास भारतात कोणत्याही भाषेत अद्याप लिहिला गेलेला नाही. आतापर्यंत काश्मीरच्या इतिहासावर आधारित १२ पुस्तके प्रसिध्द करण्यात आली असून, सध्या आणखी पाच पुस्तकांचे काम सुरु आहे. 
 

Web Title: History of Kashmir to be seen in Literature : Initiative sarhad and Sanjay Sonawani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.