इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 01:33 PM2017-08-07T13:33:38+5:302017-08-07T13:34:40+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे
मुंबई, दि. 7- राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. शिक्षण मंडळाच्या इयत्ता सातवी आणि नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा धडा वगळण्यात आला आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यावर मुख्यत्वे जोर देण्यात आला आहेत.राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता सातवी आणि नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात मुघल आणि मुघल शासनपूर्वीच्या रजिया सुल्तान आणि मुहम्मद बिन तुघलक आदी मुस्लिम राज्यकर्त्यांचा पाठ्यपुस्तकात उल्लेख होता. तो नव्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. शिवाय मुस्लिम राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या ताज महल, कुतूब मिनार आणि लालकिल्ल्याचा उल्लेखही पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला आहे.
नव्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यावर भर देण्यात आला आहे. तर नववीच्या पुस्तकात बोफोर्स घोटाळा आणि आणिबाणीचा उल्लेख करण्यात आला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत घेतलेल्या बैठकीनंतर आधुनिक इतिहास शिकविण्याच्या नावाखाली मुघलांचा इतिहास गायब करण्यात आल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
इतिहास विषयाला अपडेट करण्याचा आणि आधुनिक घटनांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुघलांचा इतिहास कमी करण्यात आला. असं आधीच्या पाठ्यपुस्तक संशोधन समितीचे सदस्य बापूसाहेब शिंदे यांनी सांगितलं. याबाबत तावडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात 9व्या शतकापासून ते 18 व्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा समावेश आहे. यामध्ये अकबर बादशाच्या शासनकाळाला फत्त तीन ओळीमध्ये सांगण्यात आलं आहे. आधीच्या पाठ्यपुस्तकात अकबराचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला होता, तोही आता वगळण्यात आला आहे.अफगाणी आक्रमकांनीच रूपया चलनात आणल्याचा उल्लेखही पाठ्यपुस्तकात देण्यात आलेला नाही. नव्या पाठ्यपुस्तकातून रजिया सुल्तान, मुहम्मद बिन तुघलक आणि शेर साह सूरीचा इतिहासही वगळण्यात आला आहे.