निसर्गाचा इतिहास शिकविला जावा
By admin | Published: January 20, 2015 12:59 AM2015-01-20T00:59:27+5:302015-01-20T00:59:27+5:30
निसर्गाविषयीचे संस्कार रुजविण्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांप्रमाणेच शालेय अभ्यासक्रमामध्ये ‘निसर्गा’चा इतिहास शिकविला गेला पाहिजे.
पुणे : निसर्गाविषयीचे संस्कार रुजविण्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांप्रमाणेच शालेय अभ्यासक्रमामध्ये ‘निसर्गा’चा इतिहास शिकविला गेला पाहिजे. योग्य वेळी धोक्याचा इशारा मिळाला, तरच त्याचा उपयोग होऊ शकेल; अन्यथा निसर्गदेखील इतिहासजमाच होईल, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक आणि नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
वसुंधरा महोत्सव व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने सोमवारी आयोजित ‘तिसऱ्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलना’चे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी तसेच गुजराती-केळवणी मंडळाचे पदाधिकारी हरिशभाई शहा, एच. व्ही. सरदेसाई महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश पाठारे, वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘फार पूर्वीच्या काळी ‘पर्यावरण’ हा शब्द अस्तित्वात नव्हता. मनुष्य हाच एक निसर्गाचा भाग होता. निसर्गात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे निसर्ग आणि मानवाचे एक अतूट नाते तयार झाले होते. मात्र, काळानुरूप वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाला धोका निर्माण झाला. मनुष्य निसर्गाचा गुलाम किंवा मालक नसून मित्र आहे. निसर्ग म्हणजे मनुष्याला मिळालेली ठेव आहे.
मात्र, भांडवलशाही व्यवस्थेला विरोध करायचा की, त्या व्यवस्थेच्या पोटात शिरायचे किंवा त्यावर स्वार होत पुढे जायचे, हा तात्त्विक मुद्दा आहे.’’
या कार्यक्रमात नीलिमा बोरवणकर लिखित ‘गाज’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.(प्रतिनिधी)
४ पर्यावरणाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगून शालेय अभ्यासक्रमात निसर्गाचा इतिहास शिकविण्याची अपेक्षा डॉ. मोरे यांनी व्यक्त केली.
पुणे : पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे केवळ बाह्य पर्यावरणाची हानी नसते. बाह्य पर्यावरणाबरोबरीनेच आंतरिक पर्यावरण, मानसिक संतुलन, शरीरस्वास्थ्याकडे लक्ष देऊन खरा विकास कसा साधता येईल, हे पाहणे गरजेचे आहे. ऊर्जा कधीच वाढत नाही, तिचा कायम ऱ्हासच होतो. स्वत:च्या गरजा पुरवण्यासाठी आणि विकास साधण्याच्या नावाखाली विविध ऊर्जांचा अमाप वापर करून विनाशाकडे वाटचाल सुरू आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप यांनी व्यक्त केले.
पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनात ते पत्रकारांशी बोलत होते. शहर हीच एक पर्यावरणाची सर्वांत मोठी समस्या आहे. उद्योगीकरणामुळे शहरीकरण होते. शहरीकरण झाले की गर्दी वाढते, त्यामुळे लोकांच्या गरजा निर्माण होतात. त्या गरजा पुरवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर वाढतो आणि अर्थातच याचा परिणाम कचऱ्याची वाढ होते. तसेच पुनर्वापर म्हणजे इको फ्रेंडली नाही. प्लॅस्टिकचा पुनर्वापर होतो. परंतु, मुळातच इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापरच का करावा, असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
आपल्याला जे फुकट मिळतंय ते आपण वाया घालवतो आणि ज्या संपुष्टात येणाऱ्या ऊर्जा आहेत, त्याचा अतोनात वापर करून त्या संपवायच्या मागे लागलो आहोत. मानवाची विकासनीती ही पर्यावरणस्नेही व जीवनशैली निसर्गस्नेही असायला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.