इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी यांचे निधन
By admin | Published: August 31, 2016 09:04 PM2016-08-31T21:04:33+5:302016-08-31T21:04:33+5:30
प्रख्यात इतिहास संशोधक तथा माजी प्राचार्य डॉ. दाऊद दळवी यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा: आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. ठाण्याच्या इतिहासावर त्यांनी मोठा प्रकाशझोत टाकला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 31 - प्रख्यात इतिहास संशोधक तथा माजी प्राचार्य डॉ. दाऊद दळवी यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा: आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. ठाण्याच्या इतिहासावर त्यांनी मोठा प्रकाशझोत टाकला आहे.
डॉ. दाऊद दळवी हे गेले काही दिवस किडणीच्या विकाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक जीवनातूनही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. अनेक दिवस ते घरातूनच कोकण इतिहास परिषदेचे काम पहात होते. मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर ठाण्यातील परम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. नुकतेच त्यांना घरी आणले होते. बुधवारी सायंकाळी त्यांचे राहत्या घरीच निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, 2 मुली, सून, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांचा दफनविधी होणार आहे.
कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते सध्या काम करीत होते. कोईपची स्थापना करण्यापूर्वी ते ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. 1998 साली ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ठाणे जिह्यासह कोकणच्या इतिहास संशोधनावर लक्ष केंद्रीत केले होते. कोकणातील लेणींवर त्यांचा विशेष अभ्यास होता. इतिहासाच्या संशोधनावरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ठाणे शहराचा इतिहास त्यांना मुखोद्गत होता.