हिट अॅण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन मुकुंद अभ्यकरांना अटक
By admin | Published: July 18, 2016 09:04 AM2016-07-18T09:04:47+5:302016-07-18T12:55:36+5:30
हिट अँण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ मुकुंद अभ्यकर यांना अटक करण्यात आली आहे, मुकुंद अभ्यकर यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला होता
Next
>ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. १७ : हिट अँण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ मुकुंद अभ्यकर यांना अटक करण्यात आली आहे. मुकुंद अभ्यकर यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास भांडारकर रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर मुकुंद अभ्यकर यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रात्री वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुकुंद अभ्यकर यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अरुंधती गिरीष हसबनीस (वय 27, रा. विलोचन रेसिडेन्सी, न-हे) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुंधती या पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी करतात. तर त्यांचे पती एका संगणक कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांना अडीच वर्षांचा ओजस नावाचा मुलगा आहे. रविवारी दुपारी अरुंधती त्यांच्या दुचाकीवरुन भांडारकर रस्त्यावरुन मैत्रीणीकडे जात होत्या. लॉ कॉलेज रस्त्याकडून त्या गुडलक हॉटेलच्या दिशेने जात होत्या.
त्याच वेळी पाठीमागून अभ्यंकर त्यांच्या मोटारीमधून पत्नीसह गुडलक चौकाच्या दिशेने जात होते. ते स्वत: चालवीत असलेल्या भरधाव मोटारीची अरुंधती यांच्या दुचाकीला धडक बसली. भांडारकर रस्त्यावरील बँक ऑफ बडोदासमोर झालेली ही धडक एवढी जोरात होती की अरुंधती रस्त्यावर जोरात आदळल्यामुळे हेल्मेटही तुटले. हेल्मेट असूनही त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. अपघातानंतर आयसीआयसीआय बँकेच्या बोळामधून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाठीमागून येत असलेल्या पोलिसांसह नागरिकांनी अभ्यंकर यांना पकडले.
मी गुडलक चौकाकडून लॉ कॉलेजच्या दिशेने मोटारीमधून जात होतो. बँक ऑॅफ बडोदापासून थोडे पुढे गेल्यावर पाठीमागून आलेल्या एका नागरिकाने मला एक महिला दुचाकी घसरुन पडली असून पाठीमागे अपघात झाल्याचे सांगितले. मी मोटार वळवून पाठीमागे जाऊन पहात असताना नागरिकांनी मलाच पकडले. पोलीस आल्यावर ते मला पोलीस चौकीमध्ये घेऊन आले. मी अपघात केलेला नाही असा दावा मुकुंद अभ्यंकर यांनी केला आहे.