हिट अँड रन प्रकण: कमाल खानला समन बजावण्याची सलमानच्या वकिलांची मागणी
By Admin | Published: November 16, 2015 05:23 PM2015-11-16T17:23:16+5:302015-11-16T17:25:47+5:30
वांद्रे येथे २००२ साली झालेल्या हिट अँड रन प्रकरणी गायक कमाल खान याला साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सलमान खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - वांद्रे येथे २००२ साली झालेल्या हिट अँड रन अपघाताप्रकरणी गायक कमाल खान याला साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका अभिनेता सलमान खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली आहे. अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेला कमाल ' गाडी नक्की कोण चालवत होतं यावर प्रकाश टाकू शकेल' असे सांगत सलमानच्या वकिलांनी त्याला साक्षीदार म्हमून बोलावण्याची मागणी केली आहे.
अभिनेता सलमान खानने २००२ साली मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत वांद्रे येथील फूटपाथवरील झोपलेल्या नागरिकांना चिरडले होते, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले होते. यावेळी गाडीत सलमानसह त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग, अंगरक्षक पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील तसेच कमाल खान उपस्थित होता. अपघातावेळी आपणच गाडी चालवत असल्याचा ड्रायव्हर अशोक सिंगने कबूलीजबाब दिला होता, मात्र काही दिवसांनी त्याने आपला जबाब बदलला होता. तर खटल्याच्या सुनावणीदरम्यानच रवींद्र पाटील याचा मृत्यू झाल्याने अपघाताचा कमाल हा एकमेव साक्षीदार उरला आहे. मात्र अपघातानंतर काही दिवसांनीच कमाल देशाबाहेर पळून गेला व सध्या तो अज्ञातवासात आहे. अपघात कसा घडला, गाडी नक्की कोण चालवतं होतं, या सर्व बाबी स्पष्ट होण्यासाठी कमालची साक्ष अतिशय महत्वाची असून त्या पार्श्वभूमीवरच सलमानच्या वकिलांनी त्याला समन्स बजावण्याची मागणी केली आहे.