पानसरे को मारा, निखिल को मारुंगा!
By admin | Published: September 22, 2015 02:09 AM2015-09-22T02:09:11+5:302015-09-22T02:09:11+5:30
‘पानसरे को मारा, अभी ये निखिल को मारुंगा तो यकीन करेगी क्या? असे समीर गायकवाडने आपल्या मैत्रिणीवर प्रभाव टाकण्यासाठी म्हटले होते
डिप्पी वांकाणी, मुंबई
‘पानसरे को मारा, अभी ये निखिल को मारुंगा तो यकीन करेगी क्या? असे समीर गायकवाडने आपल्या मैत्रिणीवर प्रभाव टाकण्यासाठी म्हटले होते, असे पानसरे हत्या प्रकरणाच्या तपास पथकातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
मैत्रिणीवर ‘इम्प्रेशन’ टाकण्यासाठी त्याने पानसरेंना संपविण्यात आपला कसा सहभागी होता, असे त्याने सांगितले. त्यावर तिने ‘तू थापा मारत असल्याचे’, त्याला सांगितले. त्यानंतर त्याने तिला आपल्या रडारवर निखिल वागळेदेखील असल्याचे सांगितले. वागळेंना ठार मारल्यावर तू माझ्यावर विश्वास ठेवशील, असे समीर गायकवाडने तिला सांगितले, अशी माहिती या प्रकरणाच्या चौकशीशी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गायकवाडच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी समीर व मैत्रिणीला समोरासमोर उभे करण्यात आले. तेव्हा समीरने पानसरे हत्येबद्दल तसेच वागळेंबद्दल मला खरोखर तसे सांगितल्याचे तिने कबूल केले. परंतु गायकवाडने मी केवळ तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी व मी किती धोकादायक व शक्तिशाली आहे दाखविण्याचा प्रयत्न करीत होतो, असे सांगितले.
सध्या तरी गायकवाड काही कबूल करीत नाही. पोलीस मुख्य सूत्रधाराबाबत व तसेच गायकवाड याला अर्थसाह्य कुठून होत असे, याचे पुरावे गोळा करीत आहेत. गायकवाडचे दाखविणयापुरते मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते; परंतु त्याला दुसऱ्या कुठून तरी पैसा मिळत होता व त्यातून त्याचे उद्योग चालायचे, असा पोलिसांना संशय आहे.
समीर गायकवाडने अशाच स्वरुपाचे संभाषण त्याचा नातेवाईक जाधव याच्याशीही केले होते. या जाधवला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर दोघांनाही एकमेकांच्या समोर उभे करण्यात आले होते, असे एक अधिकारी म्हणाला.
समीर गायकवाडचा नाशिक विभाग मोडून काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. तो सांगली आणि मुंबईत सक्रिय होता. नाशिकमध्ये त्याची यंत्रणा होती याबद्दल त्याच्याकडून अधिक तपशील काढून घेण्याच्या प्रयत्नांत आहोत, असे ते म्हणाले. नाशिकमध्ये तो कोणाला संपविण्याची योजना आखत होता का, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की नेमके हेच आम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचे आहे.
ढालगावात छापे : पोलीस पथकाने शनिवारी मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित प्रवीण लिमकर याच्या ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन नातलगांच्या घरांवर छापे टाकले. दोन ते तीन तास घरांची झडती सुरू होती. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सहा वर्षांपासून फरार असलेला प्रवीण त्याच्या नातलगांच्या संपर्कात आहे का, याची चौकशी करण्यासाठीच छापे टाकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.