हजार शाळा होणार हायटेक
By admin | Published: September 8, 2016 01:50 AM2016-09-08T01:50:02+5:302016-09-08T01:50:02+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षण आनंददायी असावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हाती घेतले आहेत
पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षण आनंददायी असावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हाती घेतले आहेत. याला रोटरी इंटरनॅशनल क्लबने मदतीचा हात दिला असून १ हजार शााळांमध्ये ते इ-लर्निंग संच देणाची घोषणा बुधवारी करण्यात आली. यापूर्वी ९९० शाळांना जिल्हा परिषदेने इ-लर्निंग दिले आहेत.
१३०० शाळांमध्ये कृतियुक्त अध्ययन पद्धती, ७०० शाळा आयएसओ, संगणक मोबाईल व्हॅन, सौर अभ्यासिका, सेमी इंग्रजी शाळा आदी विविध उपक्रम हाती घेत जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी ९९० शाळांना जिल्हा परिषदेने यापूर्वी लोकसहभागातून इ-लर्निंग संच दिले असून काही शाळा या टॅबवर शिक्षण घेत आहेत. काही शाळा या हायटेक होत आहेत. याला मदतीचा हात पुणे जिल्हा रोटरी इंटरनॅशनल क्लबने दिला आहे. बुधवारी जिल्हा परिषद व रोटरी क्लब यांच्यात एक सामंजस्य करार झाला. त्यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हा परिषद व रोटरीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत करण्यात आल्या आहेत.
यात सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे १ हजार शाळांना रोटरी इ-लर्निंग संच देणार आहे. सुमारे ८० हजार किमतीचा हा संच ५० पेक्षा जास्त पट असलेल्या शाळांना देण्यात येणार आहे. त्यात प्रोजेक्टर, यूपीएस बॅकअप, हार्डवेअर, सॉफ्टवेअरचा समावेश असणार आहे. मोबाईलच्या जमान्यात हायटेक शिक्षणाकडे मुलांचा कल वाढत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे २०० शाळांना ग्रंथालय देणार असून पुस्तकांसाठी कपाट, ३०० मराठी पुस्तकं, १५० इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी मॉनिटरही नेमण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ३०० शाळांना हॅन्डवॉश स्टेशनही देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी रोटरीचा पुढाकार राहणार आहे. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, प्रांतपाल प्रशांत देशमुख, रोटरीच्या साक्षरता समिती अध्यक्षा वैशाली भागवत आदी उपस्थित होत्या.
शिक्षण हा शाश्वत विकास आहे. या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासह संपूर्ण साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोटरी आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार होत आहे, याचा मला अभिमान आहे.
- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद
सायलंट पद्धतीची शैक्षणिक क्रांती घडविण्याचा रोटरीचा प्रयत्न आहे. करारानुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणाबरोबरच आनंदी शाळा करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शंभर शिक्षकांना ‘राष्ट्र उभारणी’ पुरस्कार देऊन गौरवण्याची योजनाही या प्रकल्पात आहे.
- प्रशांत देशमुख, प्रांतपाल, रोटरी