पाकिस्तानविरोधात कारवाईसाठी मोदींच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल - उद्धव ठाकरे
By Admin | Published: July 12, 2017 08:19 AM2017-07-12T08:19:57+5:302017-07-12T08:21:27+5:30
देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडेतोड टीका केली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी अतिरेक्यांवर कारवाई करण्याच मागणी करत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. अतिरेकी व पाकडय़ांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत ३७० कलम हटवून कश्मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या. वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या धमक्यांना आणि डरकाळ्यांना आपण जुमानत नसल्याची बांग ठोकून अमरनाथ यात्रेकरूंचे हत्याकांड घडले आहे. हे सर्व काँग्रेस राजवटीत घडत होते म्हणून हिंमतवाल्यांचे राज्य देशातील जनतेने आणले आहे, पण राज्य बदलल्याचे चित्र कश्मीर खोऱ्याततर अजिबात दिसत नाही. आज देशाला खरे तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या गर्जनेनंतर अतिरेक्यांनी शेपूट घातले ते घातलेच व अमरनाथ यात्रा पुढची २०–२१ वर्षे सुरळीत पार पडली. आज पुन्हा अतिरेकी मोकाट सुटले आहेत. मोदीजी, त्यांना आवरा हो! असं आवाहनच उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
हिंदुस्थानचे पंतप्रधान नुकतेच चार-पाच देशांच्या दौऱ्यावर जाऊन आले. परकीय भूमीवर जाऊन त्यांनी हिंदुस्थानच्या भूमीवरील दहशतवादावर चिंता व्यक्त केली. मित्रराष्ट्रांच्या (?) मदतीने दहशतवादाशी लढण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. मात्र त्याच वेळी इकडे कश्मीरात नऊ निरपराध्यांच्या हत्येने देश हादरला आहे. हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या धमक्यांना आणि डरकाळ्यांना आपण जुमानत नसल्याची बांग ठोकून अमरनाथ यात्रेकरूंचे हत्याकांड घडले आहे. केंद्रात मोदींचे मजबूत व जम्मू-कश्मीरात पीडीपी – भारतीय जनता पक्षाचे पोलादी राज्य असताना रक्तपाताचा महापूर यावा याची चिंता आम्हाला आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
कश्मीर खोऱ्यात आज कोणाचेही राज्य नसून तिथे दहशतवाद व हिंसाचाराचे थैमान घालणारे अतिरेक्यांचे सरकार सुरू आहे. हे अतिरेक्यांचे सरकार खतम करण्यासाठी आज ५६ इंच पोलादी छातीचे राज्य हवे. मोदी यांच्या रूपाने ते लोकांनी आणले असले तरी कश्मीरातील जवानांचे हौतात्म्य व निरपराध्यांचा रक्तपात का थांबलेला नाही, याचे उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिनसाहेब देऊ शकणार नाहीत. हे उत्तर आपल्यालाच द्यावे लागेल अशी उपहासात्मक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
अर्थात केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यावरून तशी ‘चोख’ उत्तरे लगेच ‘ट्विटर’वरून दिली आहेत. हिंदुस्थान घाबरणार नाही, झुकणार नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनीदेखील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र हे अमानुष हल्ले थांबविण्याची हिंमत आज कोणात आहे? कश्मीरातील अमानुष हत्याकांडानंतर सरकारने एक केले ते म्हणजे नेहमीप्रमाणे ‘हाय ऍलर्ट’चा इशारा देऊन दिल्लीची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ही व्हीआयपींच्या सुरक्षेची सोय झाली, पण फक्त दुःख व्यक्त करून, कागदी निषेध करून आपण अतिरेक्यांशी कसे लढणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
पाकिस्तानने पोसलेले ‘झुंड’ आमच्या हद्दीत घुसतात व जवानांची मुंडकी उडवून घेऊन जातात आणि आपण योग्य वेळी बदला घेण्याची भाषा करतो. ती योग्य वेळ येण्याआधीच अतिरेकी नवा हल्ला करून रक्तपात घडवितात. हे सर्व काँग्रेस राजवटीत घडत होते म्हणून हिंमतवाल्यांचे राज्य देशातील जनतेने आणले आहे, पण राज्य बदलल्याचे चित्र कश्मीर खोऱ्यात तर अजिबात दिसत नाही. कश्मीरातील ‘पाक झिंदाबाद’च्या घोषणा थांबलेल्या नाहीत व लष्करी जवान हे ‘हिंदुस्थानचे कुत्रे’ आहेत अशी देशद्रोही भावना त्या ठिकाणी वाढीस लागली आहे. मग तिथे बदलले काय? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.